प्रतिनिधी/ बेळगाव
कन्नड प्राधिकरणाने बैठक घेऊन मराठीसह इतर सर्व भाषा काढून फक्त कन्नड भाषेच्या पाट्या लावण्याचा निर्णय घेतला. याविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्यावतीने बैठक घेण्यात आली. जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष शुभम शेळके होते.
प्रारंभी मराठा बँकेचे माजी संचालक बी. एस. पाटील, संभाजी रोडचे ज्येष्ठ पंच महादेव पाटील यांच्यासह निधन झालेल्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार व तज्ञ समितीची पुनर्रचना केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सीमाप्रश्न लवकरात लवकर कसा सुटेल, यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्नशील रहावे, अशी मागणी करण्यात आली.
सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, अशोक घगवे, चंद्रकांत पाटील, खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्यासह नारायण मुचंडीकर, विजय जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









