Youth committed suicide by hanging himself in Achra-Jamdul
आचरा जामडूल येथील समिर पर्शुराम आचरेकर वय 35 याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या रहात्या घरातील देवघर खोलीत लाकडी बाराला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची खबर त्याचे वडील पर्शुराम संभाजी आचरेकर यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत वडीलांनी दिलेल्या जबाबानुसार समिरचे दोन वर्षापासून मानसिक संतूलन बिघडले होते. त्याच्यावर उपचार केले गेले होते. दोन फेब्रुवारी पासून तो आचरा येथील एका खाजगी शाळेत कामासाठी रुजू झाला होता. गुरुवारी नेहमी प्रमाणे दैनंदिन कामे आटोपून दुपारी देवघर खोलीत पोटात बर नसल्याने झोपला होता. सायंकाळी पाच वाजता मुले क्लासला यायला झाली म्हणून त्याला उठवायला गेलो असता समिर गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. यावेळी त्याचे वडील पर्शुराम आचरेकर यांनी आरडाओरडा केल्यावर लगतच्या शेजाऱ्यांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे,सहाय्यक उपनिरीक्षक महेश देसाई, पोलीस कर्मचारी सौ मिनाक्षी देसाई, मनोज पुजारे, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, जिल्हा परीषद सदस्य जेरान फर्नांडिस आदी घटनास्थळी दाखल झाले होते.या घटनेचा अधिक तपास आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तुकाराम पडवळ करत आहेत. मयत समिर आचरेकर याच्या पश्चात आई, वडील,एक भाऊ,बहिण असा परीवार आहे.
आचरा प्रतिनिधी









