क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
टायब्रेकरवर एफसी गोवा 18 वर्षांखालील संघाचा 6-5 गोलानी पराभव करून शापोरा युवक संघाने गोवा पोलीस क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या पोलीस चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. धुळेरच्या मैदानावर खेळविण्यात येणाऱया अन्य एका लढतीत तांत्रिक कारणास्तव वेळसाव स्पोर्ट्स क्लबला यूथ क्लब ऑफ मानोराविरुद्ध खेळता आले नाही. यामुळे यूथ क्लब ऑफ मानोराला पुढे चाल देण्यात आली.
पर्रा फुटबॉल मैदानावर खेळविण्यात आलेला एफसी गोवा युवा आणि शापोरा युवक संघ यांच्यातील सामना पूर्ण वेळेत 2-2 असा अनिर्णीत राहिला. सामन्याच्या 16व्या मिनिटाला शापोराच्या सत्चिदानंद सालेलकरने गोल करून संघाला आघाडीवर नेले होते. त्यानंतर लगेच 25व्या मिनिटाला अमन अत्तारने एफसी गोवाला बरोबरीत आणले. मध्यंतरापूर्वी चार मिनिटात दोन गोल झाले. प्रथम 41व्या मिनिटाला ब्रायसन परेराने गोल करून एफसी गोव्याला आघाडीवर नेले तर 45व्या मिनिटाला रोहित तोताडने शोपाराचा दुसरा गोल करून बरोबरी साधली.
दुसऱया सत्रात एकही गोल न झाल्याने सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर झालेल्या टायब्रेकरवर शापोरा युवक संघासाठी प्रतीक धारगळकर, स्टीफन मार्टिंन्स, अक्षय दाभोळकर व हर्षद गावकरने तर पराभूत एफसी गोवा युवा संघासाठी आल्फियानो फर्नांडिस, प्रदय़ूत गावकर व सिड्रॉय कार्वाल्होने प्रत्येकी एक गोल केला. आज बुधवारी या स्पर्धेत वायबीटी पणजी आणि गोवा पोलीस संघात धुळेर फुटबॉल मैदानावर लढत होईल.









