स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे अडकला जाळ्यात
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व परिसरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. हुंचेनहट्टी येथे घरफोडी करताना पिरनवाडी येथील एका तरुणाला स्थानिक नागरिकांनी रंगेहाथ पकडले असून त्याला बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
शुक्रवार दि. 27 डिसेंबर रोजी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास वीरभद्रनगर, हुंचेनहट्टी येथे घरफोडीचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी अफताब महम्मदहनीफ अत्तार (वय 27, रा. अन्सार गल्ली, पिरनवाडी) याला स्थानिक नागरिकांनी रंगेहाथ पकडून बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी अफताबला अटक केली आहे.
वीरभद्रनगर हुंचेनहट्टी येथील श्वेतप्रिया शाम नाईक यांच्या गंगानिवास या घरात चोरीचा प्रयत्न झाला आहे. श्वेतप्रिया पहिल्या मजल्यावर झोपल्या होत्या. शुक्रवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास तळमजल्यावरील दरवाजाला लावलेले कडीकोयंडा तोडून अफताबने घरात प्रवेश केला. त्याने ऐवज पळविण्यासाठी कपाटही फोडले होते.
हा प्रकार सुरू असतानाच स्थानिक नागरिकांना जाग आली. ही गोष्ट लक्षात येताच अफताबने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्याला पकडून घरात केंबले. 112 क्रमांकावर संपर्क साधून पहाटे पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस दाखल झाल्यानंतर अफताबला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटकेची प्रक्रिया पूर्ण करून त्याला न्यायालयासमोर हजर केले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी रामतीर्थनगर परिसरात ऑक्सिजन सिलिंडर व एलपीजी सिलिंडरचा वापर करून सराफी दुकान फोडताना किरण येळ्ळूरकर (वय 28), रोहित उचगावकर (वय 24 दोघेही रा. कणबर्गी) यांना अटक केली होती. माळमारुती पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही जोडगोळी जाळ्यात अडकली होती. त्यापाठोपाठ हुंचेनहट्टी येथे घरफोडी करताना एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.









