वेदा मणेरीकर यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
अभिव्यक्ती पणजीतर्फे प्रतिवर्षी युवा जागृती आयोजित केला जातो. यंदा शनिवार दि. 11 रोजी गोवा राज्य जैवविविधता मंडळ, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण, इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा आणि अभिव्यक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्यक्ष स्वरूपात युवा जागृतीचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच युवा जागृती संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले आहे. यंदा युवा जागृती हायब्रीड स्वरूपात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती युवा जागृतीच्या समन्वयक वेदा मणेरीकर यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अभिव्यक्ती पणजीचे साईश देशपांडे, इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे सदस्य सचिव गोरख मांद्रेकर उपस्थित होते.
युवा जागृतीच्या संकेतस्थळावरून देशभरातील स्पर्धकांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी नोंदणी केली आहे. सध्या आभासी स्पर्धांसाठी प्रवेशिका स्वीकारल्या जात आहेत. ऑनलाईन स्पर्धांसाठी नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका पाठवाव्यात. फोटोग्राफी, शॉर्ट फिल्म, आणि रील या ऑनलाईन स्पर्धा असून आतापर्यंत देशभरातून 240 पेक्षा अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. यात आसाम, मणिपूर, महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तरप्रदेश, झारखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, नागालँड आणि गोवा या 17 राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. यात फक्त गोव्यातील शैक्षणिक संस्था भाग घेण्यास पात्र आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी नवरचित गीतावर समूहगीत गायन स्पर्धा आणि भित्तीचित्र स्पर्धा तर उच्च महाविद्यालयीन आणि कॉलेजातील विद्यार्थ्यांसाठी पथनाटय़ स्पर्धा घेतल्या जातील. सर्व स्पर्धकांनी नोंदणी युवा जागृती संकेतस्थळावरून करावी असे आवाहन वेदा मणेरीकर यांनी केले.
दि. 11 रोजी दुपारी 12.30 वा. बक्षीस वितरण सोहळा होणार असून ज्यात ऑनलाईन आनी ऑफलाईन विजेत्यांची नावं घोषित केली जातील. ऑनलाईन बक्षिस विजेत्यांच्या खात्यावर रोख रक्कम जमा केली जाईल, ऑफलाईन विजेत्याना बक्षिस वितरण सोहळय़ात रोख रक्कम प्रदान केली जाईल. हाईब्रीड स्वरूपांत होणा-या ह्या कार्यक्रमांत बक्षिसाची एकूण रक्कम रुपये एक लाख पेक्षा जास्त आहे. बक्षीस वितरण सोहळय़ापूर्वी अर्धा तास उक्ती माची हा कार्यक्रम होईल. अभिव्यक्ती ही प्रयोग करणारी संस्था आहे. त्यामुळे स्पर्धेव्यतिरिक्त स्पर्धकांना आणि कलाकाराना मंच प्रदान करणं हे पण आमचं उद्दीष्ट आहे. तर ह्या उक्ती माची प्रकल्पाअंतर्गत युवक कलाकारांना सामाजिक बांधिलकीशी निगडीत प्रयोगक्षम सादरीकरणासाठी मंच उपलब्ध केला जाईल अशी माहिती वेदा मणेरीकर यांनी दिली. 2013 ते 2020 पर्यंत इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा येथे ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 2020 साली युवा जागृतीमध्ये गोव्यातील 650-700 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धानी भाग घेतला होता. गेली 2 वर्षे आभासी (ऑनलाईन) माध्यमाद्वारे राष्ट्रीय युवा जागृतीचे आयोजन केले होते. गेल्या वषी 20 राज्यांतल्या 300 स्पर्धकानी आभासी माध्यमाद्वारे युवा जागृतीत भाग घेतला असे अभिव्यक्ती पणजीचे साईश देशपांडे यांनी सांगितले.









