कोल्हापूर :
महाराष्ट्रात बंदी असणाऱ्या गुटख्याची कोल्हापूर, सांगली जिह्यात तस्करी करणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. रविंद्र वसंत पाटील (वय 33 रा.रुई फाटा, ता. हातकणंगले, कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 3 लाख 10 हजाराचा गुटखा व साडेपाच लाखांचा टेम्पो असा 8लाख 60 हजार रुपयांचा मद्देमाल जप्त केला. रविवारी सायंकाळी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एमआयडीसी येथे सापळा रचून ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना गोपनिय सुत्रांकडून माहिती मिळाली होती की, एक तरुण निपाणी येथून विविध कंपन्यांचा गुटखा टेम्पोत भरून कोल्हापुरात येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या सुचनेनुसार पोलिसांचे एक पथक तैनात केले होते. या पथकाने रविवारी (18 मे) सायंकाळी शिरोली एमआयडीसी रोडवर सापळा रचला. यावेळी एक संशयीत टेम्पो अडवून त्याची झडती घेतली असता त्यामध्ये 7 गोण्या भरलेला गुटखा सापडला. अटक केलेल्या संशयीताने आपले नाव रविंद्र वसंत पाटील असे सांगितले. त्याच्या टेम्पोतील 3 लाख 10 हजाराचा गुटखा, साडेपाच लाखांचा टेम्पो असा 8 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जालिंदर जाधव, शेष मोरे, संतोष गळवे, वैभव पाटील, योगेश गोसावी, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, राजू कांबळे, शिवानंद मठपती, गजानन गुरव, अरविंद पाटील, संतोष बरगे, परशुराम गुजरे, अमित सर्जे यांनी ही कारवाई केली.








