मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पिढीला एक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती मिळत असते, ज्यामुळे त्या त्या पिढीची मानसिक घडण होत जाते. तरुणाईचा अभ्यास करत असताना ही गोष्ट प्रकर्षाने पुढे येते. सर्वत्र तऊणाईच्या समोर येणारे चित्र हे त्या त्या वेळेच्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार आकाराला येताना दिसते. पहा, स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या पिढीला, त्या तरुणाईला त्यावेळी स्वातंत्र्याची जी देणगी मिळाली ती अनेक नेत्यांच्या असामान्य कर्तृत्वाची, त्यागाची, बलिदानाची परिणती होती. त्या तरुण पिढीने तशा खूप हालअपेष्टा सोसल्या होत्या. परंतु देशाच्या स्वातंत्र्यासोबतच काही आकांक्षा, स्वप्नेही मिळाली होती. अफाट कष्ट, जिद्द याच्या बळावर तऊणाई काही करायचा प्रयत्न करत होती. विशेष सोयीसुविधा नसताना किंबहुना त्या सर्वांचीच वानवा असतानाही येईल त्या परिस्थितीतून मार्ग काढायचा हे त्या पिढीचे जणू ब्रीदच होते. कुटुंब ही ताकद होती. पैसा हे ‘साधन’ होते ‘साध्य’ नव्हते. स्त्रियांना त्यावेळी शिक्षण असेल वा व्यक्त होणे असेल तर तसे स्वातंत्र्य नव्हतेच.
साधारणत: सत्तरच्या दशकामधील तरुणाईमध्ये हळूहळू वेगळ्या रीतीने शिक्षणाचे महत्त्व रुजू लागले परंतु खेडोपाडी स्थिती तशी अवघडच होती. ग्रामीण भागात बहुसंख्य ठिकाणी अफाट परिश्र्रम घेतल्याखेरीज शिक्षण होणे अवघडच. आर्थिक सुबत्ता नव्हती. त्यावेळी शिक्षणाची आस असलेल्या तरुणाईने शहरात जाऊन, जशी वेळ येईल तसे जुळवून घेत शिक्षण घेणे पसंत केले. तरुणीही शिक्षणाच्या दिशेने वळू लागल्या होत्या. परंतु स्त्री पुरुषांपलीकडचे ‘माणूसपणाचे नाते’ वगैरे संकल्पनांचा तसा ठावठिकाणा नव्हता. आर्थिक स्वातंत्र्य फार क्वचितच वाट्याला यायचे. त्यावेळच्या तरुणाईच्या नात्यातही तसा मोकळेपणा नव्हता. जेंडर रोलचा जबरदस्त पगडा होताच. साधारणत: नव्वदच्या दशकातली तरुणाई झपाट्याने बदलू लागली. शिक्षण, अन्य कलाकौशल्य यांचे महत्त्व मूळ धरू लागले. शिक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक सर्व गोष्टींकडे तरुण वर्ग नीट लक्ष देऊ लागला. पालकही हळूहळू जागरुकतेने तरुणाईला पाठिंबा देऊ लागले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे जवळपास खेडोपाडी पोहचू लागले. शेती श्रेष्ठ, मध्यम व्यापार आणि नोकरी कनिष्ठ हे समीकरणच बदलले. दळणवळणाची वाढलेली साधने, विचारांचे आदान-प्रदान यामुळे मुले-मुली तशी समानतेने शिक्षणप्रवाहात येऊ लागली. जगण्याचे संदर्भ हळूहळू बदलू लागले. तऊणाईची मुशाफिरी सर्व क्षेत्रात दिसू लागली. वागण्या बोलण्यात, वेशभूषेत मोकळेपणा येऊ लागला. परंतु तरीही काही अपवाद वगळता अगदी मुक्त जीवनपद्धतीचे वेड तऊणाईला नव्हते. साधारणत: वीस वर्षांपूर्वी मोबाईल भारतात आला परंतु तरीही त्यांची संख्या, वापर फार मर्यादित होता. पुढे दहा वर्षात त्याचा झपाट्याने प्रसार झाला आणि अलीकडच्या काळात तर मोबाईलने तरुणाईच्या जगण्याची रिंगटोनच बदलली. जग जवळ आले.
आताची तरुणाई हुशार आहे परंतु अनेक समस्यांनी आज तरुणाईला घेरले आहे. नजरेआड न करता येण्यासारखे हे चित्र सर्वत्रच दिसू लागले आहे. आज संवादाची संधी असूनही प्रत्यक्ष संवाद हरवत चालला आहे. मागताक्षणी सारे मिळते आहे, एका क्लिकवर सारे जग जवळ आले आहे. अनेक गोष्टींमुळे नकार पचवायची, वाट पहायची सवय कुठेतरी तरुणाई गमावते आहे का हा प्रŽ आता समोर येऊ लागला आहे. सभोवतालची बदलती परिस्थिती, नोकरी व्यवसायातील अस्थिरता, वाढती महागाई, शिक्षणाची सोय असली तरी अफाट स्पर्धा यामुळे तरुणाईचे ताणतणाव वाढीला लागले आहेत. गावामध्ये एकमेकांजवळच्या गप्पांनी, लहान थोरांनी भरलेले गावातले पार सुने होऊ लागले. मोबाईलच्या लाईक आणि कमेंट्समध्ये, आपल्याच विश्वात तरुणाईचा बराच वर्ग रमू लागला. व्यसनाधीनतेचा विळखाही वाढू लागला. अलीकडच्या काळामध्ये विविध कारणांमुळे तरुणाईला पडणारा आत्महत्यांचा विळखाही नजरेआड न करता येण्यासारखा आहे. एकंदरच तरुणाईचे शारीरिक मानसिक आरोग्य हा विचार करायला लावणारा विषय आहे. वयात येणारी मुले-मुली, त्यांची तारुण्याकडे होणारी वाटचाल सहज सोपी न राहिल्यामुळे पालकांनाही तो ताण कुठेतरी अस्वस्थ करू लागला आहे. परंतु हे सारे जरी असलेतरी ही एक बाजू झाली, जी बऱ्याच वेळा पुढे येते. परंतु या स्पर्धात्मक जगात ज्या गतीने बाह्य जग बदलते आहे त्या गतीशी जुळवून घेताना करावी लागणारी धडपड मुलांचीही दमछाक करते. आपल्या आसपासचे वातावरण हे असेच बदलत राहणार आहे परंतु या साऱ्यामध्ये टिकून राहण्यासाठी पालकांनीही सुऊवातीपासूनच मुलांच्या बाबतीत सजग राहणे गरजेचे आहे. भावी पिढीचा ‘स्व’ उत्तम घडला तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. आपला ‘स्व’ मुख्यत्वे चार गोष्टीमधून आकार घेत असतो. नेचर, नर्चर, कल्चर, युनिकनेस.
आपल्याला आनुवंशिकतेनुसार जे मिळते ते नेचर. संस्कार, संगोपनातून मिळते ते नर्चर, संस्कृती जे देते त्यातून जे मिळते ते कल्चर आणि प्रत्येकाची स्वत:ची अशी खासियत असते ती खासियत वा स्पेशालिटी म्हणजे युनिकनेस..हे चारही मिळून ‘स्व’चा विकास होत असतो. ‘स्व’ आकाराला येत असतो. प्रत्येक गोष्ट आपापल्या जागी ‘स्व’च्या जडणघडणीसाठी कार्यरत असतेच परंतु, त्या व्यक्तीमधील खासियत ओळखून जर त्या दृष्टीने सुरुवातीपासूनच प्रयत्न केले तर तरुणाई समाजजीवनामध्ये खूप परिवर्तन आणू शकेल. समाजातील सर्व घटकांमध्ये सलोख्याचे संबंध राहण्यासाठी याची मदत होईल.
अनेकदा आपण म्हणतो की, ‘काय ही हल्लीची तरुणाई, फारच बदललंय हो सारं’ पण हे म्हणत असताना मागच्या लेखातील सुरुवातीच्या संवादातील अण्णांचे वाक्य लक्षात घेण्याजोगे आहे. ‘बदल हा होतच असतो. बदल होणे हा जगातल्या प्रत्येक गोष्टीचा स्थायीभाव आहे’ हे अगदी खरे आहे मग कोणतीही पिढी, तरुणाई त्याला अपवाद कशी बरं ठरेल? गोंधळ होतो तो असा की काहीवेळा बदल इतक्मया झपाट्याने होतो की आपण गांगरून जातो, बदल स्वीकारणे जड जाते. विशेषत: इन्स्टा, फेसबुक, वॉट्सअॅप यामध्ये रंगलेली तऊणाई पाहताना काही धक्केही बसतात परंतु अगदी सुरुवातीपासूनच पालक म्हणून मुलांच्या ‘भावनिक साक्षरते’च्या दृष्टीने सजग राहिले तर झपाट्याने बदलणाऱ्या या प्रवाहात ही तरुणाई वेगळ्या रीतीने स्वत:ला सांभाळत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवेल.
मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याप्रती सजग राहात आहार, व्यायाम याबाबतची सजगता, तसेच प्रत्यक्ष संवादाच्या खिडक्मया सुऊवातीपासूनच उघड्या ठेवल्या तर ‘संवादाची सपोर्ट सिस्टम’ वेगळी किमया घडवेल. एकविसाव्या शतकात वाटचाल करणारी ही तऊणाई अफाट हुशार आहे strength (बलस्थाने), weaknesses (उणीवा), opportunities (संधी threats
(धोके) याचा जाणीवपूर्वक आलेख काढत त्यादृष्टीने मुलांना विचार करायला शिकवले आणि या तरुणाईला योग्य ध्येय आणि धोरणांची जोड दिली तर असामान्य कर्तृत्वाच्या झळाळी सोबतच माणूसपण जपत तरुणाई यशाच्या आकाशात गरुडझेप घेईल हे मात्र खरे!!!!
– अॅड. सुमेधा संजीव देसाई








