अशा प्रकारचे जगणं हा मानवी स्वभाव आहे. म्हणजेच तो छोटय़ा छोटय़ा सुंदर अनुभवांचा एक परिपाक आहे. आपण विणतानासुद्धा नुसते सुलट किंवा चांगले टाके घालून विणू शकत नाही. त्यासाठी आपल्याला उलट टाके म्हणजेच वाईट अनुभवसुद्धा बरोबर घ्यायलाच लागतात. जेवणात सुद्धा आपल्याला गोड पदार्थ नुसते चालत नाहीत. त्याच्याबरोबर कडू, आंबट, तुरट, तिखट अशा सगळय़ा चवी लागतातच. तसेच आपल्या जगण्यातसुद्धा.
आपण जेव्हा सगळे मित्र-मैत्रिणी एकत्र जमतो त्या वेळेला आपण स्वतःबद्दल फार कमी बोलतो पण तिथे उपस्थित नसलेल्या व्यक्तीबद्दल मात्र आवर्जून बोलत राहतो. मध्यंतरी मी गुलजारांचं एक पुस्तक वाचलं. त्यातले एक वाक्मय माझ्या मनावरती फार कोरले गेले. ज्यांचं लहानपण वेदनादायी तितका तो श्रे÷ लेखक ठरतो. त्यांच्या स्वतःच्या बाबतीतले हे उदाहरण होतं हे सगळेच त्यांचे जे अनुभव आहेत ते वाचताना आपल्या मनाला स्पर्शून जातात. खरंतर त्यांची परिस्थिती वेगळी, त्यांचं लहानपण वेगळं पण ते कुठेतरी आपल्याला बरोबर घेऊन जाणार. लेखन जेव्हा करतात त्या वेळेला ते तुमच्या आमच्या मनातले लेखक होतात. पण आपण मात्र काय करतो ‘तुझ’ं ‘माझं’ करत आपलं आयुष्य जगत राहतो.
लहानपणी प्रत्येक वस्तू माझीच असते, सगळय़ा गोष्टींवर माझाच अधिकार असतो. माझी आई, माझी खेळणी, माझं पुस्तक, माझी ताई, या सगळय़ांवरची मालकी आपलीच. आपण ती दुसऱयाला द्यायला तयार नसतो पण जेव्हा आम्हाला एखादी गोष्ट दुसऱयाला द्यायला शिकवतात, त्यावेळेला जी अनुभूती येते ती अतिशय आनंददायी असते. तिथे तुझं माझं काही राहतंच नाही तिथे एक आपलेपणाचा अनुभव येतो.
आपण सतत आनंदी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करण्याचा अनुभवसुद्धा लहानपणापासूनचा. आम्ही पुढे मोठेपणीसुद्धा आम्ही खूप सुखात आहोत हे दाखवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. अगदी त्या बिरबल बादशहाच्या गोष्टीतल्या सारखं. बादशहा सुखात आहे किंवा खूप मोठा श्रीमंत आहे ते दाखवण्यासाठी अत्तराचे हौद बनवतो. पण तो जो एक थेंब त्याच्या हातातून सुटलेला असतो तो मात्र बिरबलाला सापडतो हा थेंब म्हणजेच आनंदाचे क्षण. म्हणूनच आम्हाला गोष्टीतून बिरबल होता येतं का, हे मात्र शिकायचं राहूनच जातं. असे हे अनुभवांचे कटपीस खरं म्हणजे एकत्र येऊन आपल्या जगण्याचे वस्त्र तयार होत असतात. हे कटपीस शिवत असताना कोणत्याही गोष्टीचा ताण येणार नाही हे आपण बघायला हवं. तुझ्या माझ्या अनुभवांच्या आठवणींची एक सुंदर गोधडी बनवता येते का? ते बघायला हवं. पण त्यासाठी मात्र या प्रत्येक तुकडय़ांना उलटसुलट विणीचे धागे घालायला लागतात, याची जाणीव हवी. या धाग्यांमुळे सगळय़ा कट पीसचा एक सुंदर समतोल तयार व्हायला हवा. त्यामध्ये सुख मिरवण्याच्या बरोबर दुःखही गिरवायला लागतं हे आमच्या लक्षात यायला हवं. या सगळय़ात आपलं बालपण तारुण्य किती प्रमाणात घ्यायचं ते बघायला हवं. ह्या सगळय़ा आठवणी घेऊनच आपण पुढे जात असतो. या सगळय़ा अगदी सहज घडणाऱया प्रक्रिया आहेत. कोणाला कोणत्या आठवणी जास्त येतात किंवा त्या ऐकून आपल्याला नेमकं काय वाटतं, यापेक्षा कोणतेही ताण न घेता आम्हाला हे सगळं आनंददायी कसं करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. यालाच अध्यात्मामध्ये ‘मी तू पणाची झाली बोळवण’ असं म्हणतात हे ज्यावेळी घडतं त्यावेळी खऱया अर्थाने ‘तुझं’ ‘माझं’ हे आपलं व्हायला लागतं.








