वृत्तसंस्था / रायपूर
आम आदमी पक्षाने छत्तीसगड राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची तिसरी सूची प्रसिद्ध केली आहे. या सूचीत 11 उमेदवारांचा समावेश आहे. ही सूची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घोषित केली. या पक्षाने आतापर्यंत या राज्यात 33 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
आम आदमी पक्ष आयएनडीआय आघाडीचा सदस्य पक्ष आहे. मात्र तो राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये स्वतंत्ररित्या, कोणाशीही युती न करता निवडणुका लढविणार आहे. या तीन राज्यांमधमील सर्व जागा लढविण्याचा या पक्षाने निर्धार केला असून त्यानुसार प्रचारकार्य चालविले आहे.
पूर्ण सामर्थ्यानीशी लढणार
आम आदमी पक्ष या तिन्ही राज्यांमधील निवडणुका आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी स्वबळावर आणि सर्व जागांवर लढणार आहे. अशी घोषणा या पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांनी गेल्या सोमवारी केली होती. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत राज्यातील 90 जागांपैकी 85 जागांवर उमेदवार घोषित केले असून सत्ताधारी काँग्रेसने एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे अद्याप प्रचारही प्रारंभिक अवस्थेत आहे. छत्तीसगड या राज्यात 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल.









