वृत्तसंस्था / नवी दिल्ली
समान नागरी कायद्याला आम आदमी पक्षाने तत्वत: समर्थन दिले आहे. मात्र, केंद्र सरकारने हा कायदा लागू करण्यापूर्वी सर्व समाजघटकांमध्ये सहमती निर्माण केली पाहिजे, अशीही सूचना केली आहे. या पक्षाचे नेते संदीप पाठक यांनी बुधवारी या संदर्भात पत्रकारांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
मंगळवारी मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे वंदे भारत गाड्यांचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी संहिता लागू करण्याचा संकेत दिला होता. केंद्रीय कायदा आयोगानेही यासंदर्भात सर्व धर्मसांप्रदायांच्या नेत्यांची मते मागविल्यामुळे लवकरच समान नागरी संहितेचे विधेयक संसदेत मांडले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या कायद्याला विरोध केला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळा या कायद्याची आवश्यकता आपल्या विविध निर्णयांमधून प्रतिपादन केली आहे.
समाज हा एका कुटुंबाप्रमाणे असतो. त्यामुळे कुटुंबातील एका व्यक्तीला एक कायदा आणि दुसऱ्या तशाच व्यक्तीला भिन्न कायदा लागू केल्यास कुटुंब चालू शकेल का? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित केला होता. त्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया व्यक्त केली होती. केंद्र सरकार आर्थिक मुद्द्यांवरुन लक्ष हटविण्यासाठी समान नागरी कायद्याची भाषा करीत आहे. केंद्र सरकार भिन्न भिन्न समाजांमध्ये फूट पाडत आहे, अशी टीका काँग्रेसने केली होती.









