सावईवेरे ग्रामिण वाचनालयातर्फे साहित्यिकांचा सत्कार सोहळा : पुस्तकदिनी सावईवेरे वाचनालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन

वार्ताहर /सावईवेरे
साहित्यिकांची नाळ सरळ मातीशी जोडलेली असून तिची ओळख त्यांच्या साहित्यातून आणि कवितेतून होत असते. त्या मातीशी प्रामाणिक राहणे त्याचे कर्तव्य आहे. गोमंतकीय माती अंत्यत महत्वाची असून घुमट, मातीचे गणपती, दिवज, घराच्या भिंती, घराची जमीन, स्वयंपाकाची भांडी यांचा पुर्वीपासून मातीशी संबंध आहे. गोव्याची वैशिष्टय़े जपताना त्या मातीचे प्रदूषण थांबवून सावईवेरेसारखे अनेक गाव सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी साहित्य निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे मत पद्मश्री विनायक खेडेकर यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.

जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून सावईवेरे येथील ग्रामिण वाचनालयातर्फे करण्यात आलेल्या तीन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिकांचा नागरी सत्कार सोहळयात ते बोलत होते. यावेळी त्याच्यासह दिल्लीच्या केंद्रीय साहित्य अकादमी संस्थेचे साहित्यासाठीच सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार प्राप्त संजीव वेरेकर व मंगळूरच्या विश्व कोकणी केंद्राचा प्रतिष्ठेचा विमला वी. पै. कविता कृती पुरस्कार प्राप्त झालेल्या उदय म्हांब्रे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे व प्रमुख वक्ते म्हणून आकाशवाणी पणजी केंद्राचे वृत्तनिवेदक व साहित्यिक मुकेश थळी उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी सावईवेरे वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. दत्ताराम देसाई उपस्थित होते. शिवाय सत्कारमुर्ती विनायक खेडेकर, संजीव वेरेकर व उदय म्हांब्रे उपस्थित होते.
साहित्यिकांची सद्गुणी व चारित्र्यवान ओळख असावी-थळी
मुकेश थळी म्हणाले की जागतिक पुस्तक दिन सर्वत्र साजरा केला जातो पण या दिवशी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांचा सत्कार करण्याचा प्रसंग पहिलाच सावईवेरे गावामध्ये घडला आहे. साहित्य चांगले असावेच त्याप्रमाणे माणूसही चांगला असायला हवा. साहित्यिक सज्जन, सद्गुणी सजग तसाच अंत्यत चारित्र्यवान असायला हवा. साहित्यकारांमध्ये माणुसकी महत्वाची असते. ती साहित्यिकांमध्ये असणे अंत्यत महत्वाची आहे. त्याच्या साहित्यिकांला माणूसकीचा वास असायला हवा. कोणतीही कला ही शरीरात भिनणे आवश्यक आहे. साहित्यिक हा जनतेचा मार्गदर्शक असतो म्हणून त्याचे मार्गदर्शन स्वच्छ व सजग असायला हवे. गावच्या लोकांनी दिलेली थाप अंत्यत महत्वाची असते. सावईवेरे येथील ग्रामिण वाचनालयाचा वाचकांनी फायदा घ्यावा असे ते म्हणाले.
आपल्या गावासाठी नागरिकांनी वेळ द्यावा-डॉ. दत्ताराम देसाई
डॉ. दत्ताराम देसाई म्हणाले की मला लहानपणापासून वाचनाची आवड असून लहानपणी बरीच पुस्तके विकत घेऊन घरातच वाचनालय सुरू केले होते. सावईवेऱयातून आल्यापासून 1982 सालापासून सुरू झालेल्या सावईवेरे येथील वाचनालयात मी एक वाचक आहे. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने साहित्य पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे सत्कार करण्याचे ठरले. तसेच इमारतीचे नुतनीकरण झाल्याने त्याचेही उद्घाटन व्हावे म्हणून हा दुहेरी सोहळा करण्याचे ठरल्याचे सुचित केले. कोविडकाळात विनायक खेडेकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यामुळे सत्कार करणे शक्य झाले नाही. यंदा संजीव वेरेकर व उदय म्हांब्रे या पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचे भर पडल्याने या तिघांचाही नागरी सत्कार करण्याचे निश्चित झाले. खेडय़ातील नागरिकांना पुर्वीप्रमाणे गावचा विकास करण्याहेतू पाण्य़ाचे साठे साठवणे, निसर्गाचे रक्षण करणे, पर्यावरण जपण यासारख्या कामासाठी शासनावर अवलंबून न राहता गावातील 50 वर्षावरील व्यक्तीनी महिन्यातून एक तास सामाजिक कार्यासाठी देत आपला गाव स्वावलंबी बनवावा असे आवाहन केले.
पद्मश्री विनायक खेडेकर पुढे बोलताना म्हणाले की सावईवेरे गाव हा माझा आहे. या गावचे लोक माझे आहेत, आणि याच लोकांनी आपला नागरी सत्कार घडवून आणला यासारखा दुसरा आनंद नसल्याचे उद्गार काढत ऋणनिर्देश क्यक्त केले.
संजीव वेरेकर यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले लहानपणापासून कोकणीतून लिखाण केले असून माझी नाळ या मातीशी जोडलेली आहे. आमच्या कतृत्वाचा अभिमान गावकऱयांनी मानला तसेच साहित्यिकांनी चांगले वागणे महत्वाचे आहे. ‘रक्तचंदन’ याला केंद्रीय साहित्य अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाला तेव्हा अभिमानाने माझा उर भरून आला. सावईवेऱयात मनोहर सरदेसाई, लक्ष्मण सरदेसाई व त्यानंतर मला साहित्य पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगताना साहित्यिकांचा आणि कलाकारांचा आदर्श घ्यावा. वैचारिक मतभेद विसरून विरोधकांच्या चांगल्या कतृत्वाचे अभिनंदन करणे महत्चाचे असते.
साहित्यिक व पर्यावरणवादी डॉ. दत्ताराम देसाई यांचे काम मोलाचे-म्हांब्रे
उदय म्हांब्रे म्हणाले साहित्यिक कलाकार हे तेवढेच तोलामोलाचे असतात. पण सर्वानाच पुरस्कर प्राप्त होत नाही. डॉ. दत्ताराम देसाई यांनी केवळ वैद्यकीय सेवेपुरते मर्यादीत न राहता पर्यावरणाचे रक्षण करून समाजाच्या हितासाठी कार्य करीत आले आहेत. दिलासा सारख्या इस्पितळाच्या कामातही त्याचा महत्चाचा वाटा आहे. त्याचाही सत्कार होणे आवश्यक असल्याचे मत म्हांब्रे यांनी मांडले.
यावेळी सरपंच सत्यवान शिलकर यांनीही विचार मांडले. सावईवेरे बाजारातून सख्याहरी पथकातर्फे वाद्यांच्या तालावर मिरवणूकीने सभास्थानी मान्यवरांना आणण्यात आले. त्यानंतर विनायक खेडेकर यांच्याहस्ते फित कापून नुतनीकरण केलेल्या वाचनालय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. दिप प्रज्ज्वलनाने तीन्ही साहित्यिकांच्या पुस्तकांच्या प्रदर्शनाने सोहळयाला प्रारंभ करण्यात आला.डॉ. दत्ताराम देसाई यांच्याहस्ते विनायक खेडेकर, संजीव वेरेकर, उदय म्हांब्रे यांना श्रीफळ, शाल, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक काशिनाथ नायक यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष जाण यांनी केले. विठ्ठल नाईक यांनी आभार मानले.









