सौंदर्याची व्याख्या येथे वेगळी
जगात सौंदर्यासाठी प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते, कुणी मेकअप करून सुंदर दिसू इच्छिते तर कुणी मेकअपशिवाय स्वत:ला अत्यंत सुंदर मानते. महिलांसाठी सौंदर्य तर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. परंतु महिलांचे ओठ अन् काप कापण्यात आल्यास सौंदर्याची व्याख्या काय असेल? आफ्रिकेत एका समुदायाकडून अशाप्रकारचे विचित्र कृत्य केले जाते.आफ्रिकेच्या इथियोपियाचा मुर्सी समुदाय मुली तारुण्यात येताच त्यांचे ओठ अन् कान कापून टाकतो. शहराच्या झगमगाटापासून दूर राहणारा हा समुदाय स्वत:च्या या अनोख्या फॅशनसाठी जगभरात ओळखला जातो.
ओठांमध्ये लावतात डिस्क
शहरांमध्ये महिला लिपस्टिक लावून स्वत:च्या ओठांचे सौंदर्य वाढवितात, तर मुर्सी समुदायात मुली स्वत:च्या ओठांमध्ये डिस्क अडकवून स्वत:चे सौंदर्य वाढवत असतात. ही फॅशन सोपी नसते, खालच्या ओठांमध्ये डिस्क अडकविण्याची प्रक्रिया अत्यंत वेदनादायी असते. मुलींनी तारुण्यात प्रवेश करताच त्यांच्या खालच्या ओठांमध्ये छिद्र पाडले जाते, मग त्यात एक डिस्क अडकविली जाते. काळासोबत या डिस्कचा आकार वाढविला जात राहतो. यामुळे ओठ लटकू लागतात. ही प्रक्रिया अत्यंत वेदनादायी असते, तरीही या समुदायाच्या महिला या वेदना सहन करण्यास तयार असतात. अशाचप्रकारे कानांचा खालचा हिस्साही कापला जातो.
प्रथेचा इतिहास
पूर्वीच्या काळात या समुदायाच्या लोकांना गुलाम म्हणून नेले जात होते. पुरुषांचा वापर मजुरीसाठी केला जायचा. तर महिलांना लैंगिक गुलाम म्हणून नेले जात होते. अशा स्थितीत महिला स्वत:च्या रक्षणासाठी स्वत:च्या चेहऱ्याचे विद्रुपीकरण करू लागल्या. त्यांनी स्वत:चे दात तोडले आणि डिस्क अडकवून स्वत:चे सौंदर्य लपविले, या पद्धतीमुळे त्या लोकांच्या वाई नजरांपासून वाचण्यास यशस्वी ठरल्या.









