कावळेवाडी क्रॉसजवळ अपघात
बेळगाव : भरधाव कारने मोटारसायकलला ठोकरल्याने बेळवट्टी येथील एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर तिची आई व मामा जखमी झाले आहेत. बिजगर्णी-बेळवट्टी रस्त्यावर रविवारी सायंकाळी कावळेवाडी क्रॉसजवळ ही घटना घडली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रोहिणी रामलिंग चौगुले (वय 18) राहणार बेळवट्टी असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. रोहिणीची आई लक्ष्मी रामलिंग चौगुले (वय 45) व तिचा मामा सतीश विष्णू मोहिते (वय 40) राहणार तुडये, ता. चंदगड हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या रोहिणीला सिव्हिल हॉस्पिटलला हलवताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. लक्ष्मी या गंभीर जखमी आहेत. तुडयेहून बेळवट्टीला जाताना ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रोहिणीच्या पश्चात आजी, आई, बहीण असा परिवार आहे. कारने मोटारसायकलला ठोकरल्याने हा अपघात घडला आहे. वडगाव येथील जुनेद राजगोळी याच्यावर एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर व सहकारी पुढील तपास करीत आहेत.









