ऑनलाईन टीम / तरुण भारत :
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मंगळवारी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणातील तरुणीला मंगलोर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, तरुणीची चौकशी सुरू आहे.
नितीन गडकरी यांचे नागपूर येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटलजवळ जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात मंगळवारी सकाळी दोन वेळा अज्ञाताने फोन केला. त्यावेळी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने 10 कोटींच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, या प्रकारावेळी गडकरी कार्यालयात नव्हते. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती नागपुरातल्या धंतोली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेत वाढ करत तपासाला सुरूवात केली.
यापूर्वीही गडकरींना अशाच प्रकारे कार्यालयात फोन करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 14 जानेवारीला बेळगाव कारागृहातील आरोपी जयेश कांथा उर्फ पुजारी याच्या नावे हे धमकीचे फोन आले होते. आताही त्याच नावे ही धमकी आल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार नागपूर पोलिसांची एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली.