कुमार सुरेंद्र सिंग स्मृती नेमबाजी चॅम्पियनशिप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
युवा नेमबाज अभिनव शॉ याने येथे सुरू असलेल्या कुमार सुरेंद्र सिंग स्मृती नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदके पटकावर तिहेरी मुकुट मिळविला. त्याने 10 मी. एअर रायफल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात वरिष्ठ, कनिष्ठ व युवा विभागात जेतेपद पटकावले.
17 वर्षीय अभिनव हा राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील सर्वात तरुण नेमबाज असून तो मिश्र सांघिक विभागातील कनिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनही आहे. त्याने येथे तीनही गटातील सुवर्णपदके पटकावत क्लीन स्वीप साधले. वरिष्ठ गटात त्याने मेहुली घोषसमवेत नेमबाजी करताना रेल्वेच्या मेघना सज्जनार व शाहू तुषार माने यांचा 16-4 असा पराभव केला. या विभागात इलावेनिस वलरिवन व स्मित रमेशभाई मोराडिया या गुजरातच्या जोडीने कांस्यपदक मिळविले.
कनिष्ठ गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत अभिनवने स्वाती चौधरीसमवेत पश्चिम बंगालला दुसरे सुवर्ण मिळवून देताना महाराष्ट्राच्या शांभवी क्षीरसागर व पार्थ राकेश माने यांच्यावर 16-12 अशी मात केली. मध्यप्रदेशच्या अभिनव अग्रवाल व गौमती भानोत यांनी कांस्यपदक मिळविले. शनिवारी 16 वर्षीय शांभवी क्षीरसागरने दोन वैयक्तिक सुवर्णपदके पटकावली होती.
अभिनव शॉने गोल्डन हॅट्ट्रिक नोंदवताना युवा विभागात संद्रती रॉयसह मध्यप्रदेशच्या निखिल पुनदिर व गौतमी भानोत यांना 17-5 असे हरविले. हरियाणाच्या अमीराह अर्शद व पुरु राज बिरथल यांनी कांस्य घेतले.
रीदम सांगवान व आदित्य मालरा यांनी वरिष्ठ विभागात पिस्तूल मिश्र सांघिक प्रकाराचे सुवर्ण पटकावले. हरियाणाच्या या जोडीने महाराष्ट्राच्या राही सरनोबत व प्रणव यांचा 16-14 असा चुरशीच्या लढतीत पराभव केला. त्यानंतर कनिष्ठ विभागात हरियाणाला दुसरे सुवर्ण मिळवून देताना शिवा नरवाल व कनक यांनी राजस्थानच्या जोडीवर 16-8 अशी मात केली. युवा विभागात रश्मिकाने या स्पर्धेतील चौथे सुवर्ण मिळविताना हार्दिकसमवेत कर्नाटकच्या जोडीवर 16-6 अशी मात केली.









