पंतप्रधान मोदींचे आवाहन ः विविध संस्कृती जाणून घेण्याचा मिळणार अनुभव
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘वायब्रेंट व्हिलेज प्रोग्राम’च्या हिस्स्याच्या स्वरुपात तरुण-तरुणींनी सीमावर्ती गावांचा दौरा करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी केले आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’च्या अधिकृत ट्विटर अकौंटवरून विविध राज्यांमधील तरुण-तरुणी अरुणाचल प्रदेशाच्या किबिथू आणि तूतिंग या गावांच्या दौऱयावर असल्याची माहिती देण्यात आली.
वायब्रेंट व्हिलेज प्रोग्राम हा तरुणाईला ईशान्य भारतातील जीवनशैली, समुदाय, लोकसंगीत आणि हस्तकलेबद्दल जाणून घेण्याची आणि नैसर्गिक सौंदर्यात रमून जाण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.
आमच्या युवक-युवतींना सीमावर्ती गावांचा दौरा करण्याचे आवाहन करत आहे. विविध संस्कृतींची ओळख करून घेत तेथील रहिवाशांच्या आदरातिथ्याचा अनुभव मिळविण्याची ही उत्तम संधी असल्याचे पंतप्रधान मोदींनी एका ट्विटवर व्यक्त होत नमूद केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने 2022-23 ते 2025-26 या कालावधीसाठी विशेषकरून रस्तेसंपर्काकरता 2500 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसेच वायबेंट व्हिलेज प्रोग्रामला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. हा कार्यक्रम केंद्र पुरस्कृत असून याच्या अंतर्गत व्यापक विकासासाठी अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तसेच केंद्रशासित प्रदेश लडाखमधील उत्तर सीमेला लागून असलेल्या 19 जिल्हय़ांमधील 2,967 गावांची ओळख पटविण्यात आली आहे.









