म. ए. समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सर्वांना विजयी करा : संजय राऊत यांचे आवाहन

बेळगाव : महापालिकेवरील भगवा हटविला, मणगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला, वडगाव-शहापूर रस्त्यावरील साई मंदिरसह इतर मंदिरे हटविली. तेव्हा यांचे हिंदुत्व कोठे गेले होते? असा प्रश्न करत तरुणांनो ढोंगी हिंदुत्वाला बळी पडू नका, असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. म. ए. समितीचे दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचारार्थ कारभार गल्ली, वडगाव येथे सभा घेण्यात आली. त्यावेळी भाजपवर कडाडून टीका केली. शिवसेना ही नेहमीच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. मात्र महाराष्ट्रातील भाजप नेते सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी बेळगावात दाखल होत आहेत, हे दुर्दैव आहे. जर सीमाभागातील मराठी भाषिकांबद्दल थोडीशी जरी भावनिक सहानुभूती असेल तर भाजपच्या नेत्यांनी येथे प्रचारासाठी येवू नये, जर येथे आले तर येथूनच विजयाला सुरुवात होईल आणि महाराष्ट्रात शिवसेना मोठ्या संख्येने विजयी होईल, असे सांगितले.
भाजप सरकारने ईडी आणि इतर संस्थांच्या माध्यमातून अनेकांवर गुन्हे दाखल केले. धाडी घातल्या. तशा धाडी भाजपमधील आमदार व खासदारांवरही घालाव्यात, असे त्यांनी आव्हान दिले. शिवसेना आजपर्यंत सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. तर सीमाभागातील जनतेनेही मुंबईसाठी अनेक हुतात्मे दिले आहेत. त्याची जाण महाराष्ट्रातील जनतेने ठेवणे गरजेचे आहे. भाजप म्हणजे भ्रष्टाचार धुण्याची वॉशिंग मशीन असल्याचे सांगत जर दुसऱ्या पक्षात भ्रष्टाचारी असेल तो भाजपमध्ये गेला तर त्याचदिवशी पवित्र होतो. यावरून भाजपचे कटकारस्थान जनतेला स्पष्ट दिसून येते. अयोध्येतील राममंदिर बांधण्यासाठी शिवसेनेने मोठे योगदान दिले आहे. शिवसेना नसती तर राम मंदिरच झाले नसते, असेदेखील सांगून भाजपवर कडाडून टीका केली. मराठी भाषिकांनी म. ए. समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. रमाकांत कोंडुस्कर म्हणाले, जनतेने कोणत्याही दबावाला बळी पडू नये. सत्ताधारी धमकी देत आहेत. मात्र त्या धमकींना येत्या 10 तारखेला मतदान करून सडेतोड उत्तर द्यावे, असे आवाहन केले. शेतकऱ्यांची जमीन रिंगरोड, हलगा-मच्छे बायपाससाठी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र एक इंचही जमीन जावू देणार नाही, असे रमाकांत कोंडुस्कर यांनी यावेळी सांगितले. संजय राऊत येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी म. ए. समितीच्या विजयाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. सभेच्या अध्यक्षस्थानी गल्लीतील पंच यल्लाप्पा कणबरकर होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे विजय देवणे, संजय पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
पथदीप केले बंद…
कारभार गल्ली येथे सभा होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनता जमली होती. यावेळी पथदीप बंद करण्यात आले. यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. खासदार संजय राऊत यांनी पथदीप बंद केले म्हणून काही होणार नाही तर येत्या निवडणुकीत त्यांना हिसका दाखवून तुम्हीच पथदीप लावा, असे आवाहन त्यांनी केले. या सभेला मोठ्या संख्येने म. ए. समितीचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसर गर्दीने व्यापून गेला होता.









