वैज्ञानिकांनी शोधले नवे तंत्रज्ञान
माणूस वयाच्या 60 व्या वर्षातही 30 वर्षांचा वाटू लागेल अशाप्रकारचे तंत्रज्ञान वैज्ञानिकांनी विकसित केले आहे. शरीराच्या ज्या हिस्स्यांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल, तो स्वतःचे काम करणे थांबविणार नाही तसेच तारुण्याप्रमाणे तो अवयव काम करू लागणार आहे. इंग्लंडच्या बाब्राहम इन्स्टीटय़ूटच्या वैज्ञानिकांनी या तंत्रज्ञानाला ‘टाइम जम्प’ नाव दिले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे वृद्धापकाळातही संबंधिताची त्वचा 30 वर्षीय वयाप्रमाणे होणार आहे, तसेच त्याचप्रकारे काम करणार आहे.
इन्स्टीटय़ूटमध्ये वैज्ञानिक एपिजेनेटिक्स रिसर्च प्रोग्राम चालवित असून यांतर्गत जुन्या पेशींना पुन्हा रीस्टोअर करण्याचा प्रयत्न केला जातोय. मॉलिक्यूलर स्तरावर स्वतःचे जैविक वय कायम ठेवू शकेल अशा उद्देशाने हे केले जातेय. ईलाईफ या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. अध्ययन आणि संशोधन सध्या पहिल्या टप्प्यात असले तरीही तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून वय कमी करणाऱया औषधांच्या भविष्यात मोठा बदल घडून येणार आहे.

आमच्या वाढत्या वयासह आमच्या पेशींची काम करण्याची क्षमता कमी होत जाते. जीनोम कमजोर होऊ लागतात. रीजनरेटिव्ह बायोलॉजीचे काम जुन्या पेशींच्या जागी नव्या पेशी टाकणे आणि जुन्यांना दुरुस्त करणे आहे. या कामात शरीर देखील सहाय्य करते. कुठल्याही प्रकारच्या पेशींमध्ये आपोआप स्वतःला बदलण्याची क्षमता असते. हे तंत्रज्ञान नोबेल पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकाने विकसित केले आहे. या तंत्रज्ञानात वृद्धत्वाच्या समस्या संपुष्टात आणण्याची शक्ती आहे.
2007 साली शिन्या यामानाका यांनी सामान्य पेशींना रिप्रोग्रामिंग पेशींमध्ये बदलण्याचे कार्य केले होते. त्यांच्याकडून सामान्य पेशींना इंडय़ूस्ड स्टेम सेलमध्ये बदलण्याचे काम करण्यात आले होते. स्टेम सेल रीप्रोग्रामिंगची पूर्ण प्रक्रिया 50 दिवसांची असते, यादरम्यान कुठल्याही पेशीला बदलले जाऊ शकते. प्रोग्राम करण्यात आलेल्या पेशींच्या विकासासाठी वेळ दिला जातो. यातून रीप्रोग्रामनंतर पेशी निर्धारित काम करत आहेत की नाही हे पाहिले जाते. आगामी काळात अनेक आजारांवर या तंत्रज्ञानातून उपचार केला जाऊ शकतो.









