नैतिक पोलीसगिरीचा प्रकार : गुंडगिरीमुळे परिसर बनलाय असुरक्षित
प्रतिनिधी/ बेळगाव
किल्ला तलावाजवळील उद्यानात शनिवारी दुपारी घडलेल्या नैतिक पोलीसगिरीच्या घटनेने एकच खळबळ माजली आहे. मारहाणीत एक तरुण व तरुणी जखमी झाले आहेत. तीन ते चार तास एका टोळक्याने चौकशीच्या नावाखाली या तरुण-तरुणीला कोंडून घालून मारहाण केली आहे.
यमनापूर (ता. बेळगाव) येथील एक 22 वर्षाचा तरुण व तितक्याच वयाची त्यांच्याच नात्यातील तरुणी कामानिमित्त बेळगावला आले होते. दुपारी हे दोघे किल्ला तलावाजवळील ध्वजस्तंभानजीकच्या उद्यानात पोहोचले. तेथे बोलत बसलेले असतानाच चार ते पाच जण दाखल झाले. त्या तरुणाला जाब विचारत तुझ्यासोबत असणारी तरुणी कोण? अशी विचारणा केली.
ही तरुणी आपल्याच नात्यातील असल्याचे त्याने सांगितल्यानंतरही त्यांची खात्री पटली नाही. याचवेळी आणखी काही जण जमा झाले. जवळच असलेल्या एका शेडमध्ये नेऊन तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. टोळक्यातील काही जणांनी तरुणीलाही मारहाण केली असून ही तरुणी यमनापूरचीच आहे की आणखी कोठून आली आहे? याची चौकशी करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांचे मोबाईल क्रमांक घेऊन त्यांच्याशीही संपर्क साधण्यात आला.
सुरुवातीला तरुण व तरुणीच्या कुटुंबीयांना हा प्रकार माहीत नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांच्याविषयी टोळक्यातील काही जणांनी चौकशी सुरू केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. तरुणीच्या नात्यातील एका पोलिसालाही फोन गेला. त्यामुळे हा सारा प्रकार उघडकीस आला. तरुण-तरुणीच्या कुटुंबीयांनी त्यांना शोधत किल्ला तलाव गाठला. तोपर्यंत टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली होती.
सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास या दोघा जणांची टोळक्याने सुटका केली होती. कुटुंबीयांनी एकाला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले असून जखमी तरुण-तरुणीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती समजताच मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर आदी अधिकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.









