खेड :
तालुक्यातील लवेल-शेलारवाडी धरणात मासे पकडण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रसाद प्रदीप आंब्रे (माणी-आंब्रेवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबतची खबर त्याचा भाऊ प्रशांत प्रदीप आंब्रे यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली. प्रसादशी त्यांचा दोन दिवस संपर्क झाला नव्हता. नातेवाईकांकडे शोध घेऊनही तो सापडला नव्हता. प्रसादला लवेल येथील शेलारवाडी धरणावर मासे पकडण्यास जाण्याची सवय होती. मंगळवारी तो धरणावर मासे पकडण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्यात तोल जाऊन बुडून त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह धरणातील पाण्यात तरंगताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मयत प्रसाद वेरळ येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता.








