तिगडोळीत बदल्याची मालिका सुरूच : परस्परविरोधी तक्रारी दाखल
बेळगाव : तिगडोळी (ता. कित्तूर) येथील एका युवकाचा कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला आहे. रविवारी सायं. 7.30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. खून झालेला तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. याप्रकरणी परस्परांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विजय रामचंद्र आरेर (वय 32) रा. तिगडोळी (ता. कित्तूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गँगवॉरसदृश खुनांच्या मालिकेने तिगडोळी हादरली आहे. याप्रकरणी विजयचा मामा रमेश संभोजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच गावातील दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राम पंचायत सदस्य कल्लाप्पा सद्याप्पा क्यातनावर (वय 48) सह दहा जणांविरुद्ध भादंवि 143, 147, 148, 323, 302, 109, 504, 506 सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, कित्तूरचे पोलीस निरीक्षक महांतेश होसकोटी, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेला विजय व प्रमुख संशयित कल्लाप्पा या दोघांमध्ये रविवारी रात्री क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. भांडणानंतर विजयने कल्लाप्पावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यानंतर कल्लाप्पा व त्याच्या साथीदारांनी कोयत्यांनी विजयवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विजयला सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. तलवार हल्ल्यात कल्लाप्पा क्यातनावरसह चौघे जण जखमी झाले असून त्यांना धारवाड येथील जिल्हा इस्पितळात हलविण्यात आले आहे. कल्लाप्पाची पत्नी शैला क्यातनावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कित्तूरचे पोलीस निरीक्षक महांतेश होसकोटी पुढील तपास करीत आहेत. काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
आई-वडिलांचाही झाला होता खून…
रविवारी रात्री तिगडोळी येथे खून झालेल्या विजय आरेर याच्या आई-वडिलांचाही भीषण खून करण्यात आला होता. 13 ऑगस्ट 2011 रोजी रामचंद्र आप्पाण्णा आरेर (वय 40), पत्नी पार्वती (वय 35) दोघेही रा. तिगडोळी यांचा बोगूरजवळ भीषण खून झाला होता. पार्वतीचे माहेर बेळगाव येथील आहे. रक्षाबंधन आटोपून मोटारसायकलवरून गावी जाताना या दाम्पत्याचा खून करण्यात आला होता. दरम्यान, या दुहेरी खुनात सहभागी असलेल्या बाळज्जा बसाप्पा गोधोळी (वय 32) रा. तिगडोळी नामक तरुणाचा बदला घेण्यासाठी 8 एप्रिल 2012 रोजी धर्मवीर संभाजी चौक परिसरात त्याचा खून करण्यात आला होता. बाळज्जाच्या या खून प्रकरणात विजय आरेर हाही आरोपी होता.









