प्रतिनिधी,कोल्हापूर
प्रेमप्रकरणातून बेळगाव येथे भर चौकात झालेल्या निर्घृण खून प्रकरणी कोल्हापूर स्थनिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कोल्हापुरातील दोन तरुणांना जेरबंद केले. प्रथमेश धर्मेंद्र कसबेकर (वय 20, रा. राजारामपुरी 14 वी गल्ली), आकाश काडाप्पा पवार (वय 22, रा. शिवाजी पेठ कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. मुख्य संशयित अक्षय साळुंखेने कोल्हापुरातील सराईत गुंड आकाश वडर याला सुपारी देऊन हा खून केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बेळगाव येथील माळमारुती पोलीस स्टेशन हद्दीत 30 ऑगस्ट रोजी रात्री भर चौकात नागराज गाडीवडर (वय 32, रा. बुद्धनगर निपाणी) याचा निर्घुण खून केला होता. यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. गजबजलेल्या परिसरात खून झाल्यामुळे बेळगांव पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करुन याचा छडा लावला. या प्रकरणी मुख्य संशयित अक्षय साळुंखेचा शोध सुरु असून त्याच्या सांगण्यावरुनच नागराजचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. शुक्रवारी रात्री या दोघांना प्रतिभानगर परिसरातून अटक केली. या दोघांना बेळगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील कवळेकर, अजय वाडेकर, अमर आडूळकर, तुकाराम राजीगरे, संभाजी भोसले, युवराज पाटील, प्रितम मिठारी यांनी ही कारवाई केली.
आकाश रेकॉर्डवरील गुन्हेगार
आकाश पवार हा कोल्हापूर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर गांधीनगर येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. तर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मित्राचा फोन आला आणि अडकला…
आकाश आणि प्रथमेश हे मित्र आहेत. बुधवारी दुपारी आकाशने प्रथमेशला फोन केला. आपण दोघे दुचाकीवरुन बेळगांवला जाऊया असे सांगितले. ते दोघे बुलेटवरुन बेळगांवला गेले. याच गाडीवरुन जाऊन आकाश, अक्षय व प्रथमेशने नागराजचा खून केला होता. पोलिसांनी ही दुचाकीही जप्त केली आहे. प्रथमेश हा इंजिनिअर असून तो मुंबईमध्ये नोकरी करतो. चांगल्या पगाराची नोकरी सोडून काही दिवसांपूर्वीच तो कोल्हापुरात स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी आला होता.
जेलमधील ओळखीतून सुपारी
आकाश आणि अक्षय साळुखे यांची ओळख कळंबा कारागृहात झाली होती. कारागृहात झालेल्या ओळखीतून अक्षयने आकाशला नागराजच्या खुनाची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. अक्षयने आकाशला 1 लाख 50 हजार रुपये अॅडव्हान्स दिल्याचेही तपासात समोर आले आहे. काम झाल्यानंतर उर्वरीत रक्कम दिली जाईल असेही त्याने सांगितले होते.









