रत्नागिरी :
मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरीनजीकच्या हातखंबा हायस्कूलजवळच्या तीव्र उतारावर बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा एका भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात येणाऱ्या कोळसावाहू ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने आयटीआयचा विद्यार्थी शिवम रवींद्र गोताड (20, रा. झरेवाडी, ता. रत्नागिरी) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेला मित्र निशांत कळंबटे (20) हा जखमी झाला. या अपघातात आणखीन पाच जण किरकोळ जखमी झाले असून 3 दुचाकी आणि 4 कारचेही मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मृत आणि जखमी दोघेही रत्नागिरी येथील आयटीआयचे विद्यार्थी असून ते शिक्षण घेऊन आपल्या घरी जात असताना हा अपघात झाला. या ओढवलेल्या अपघाती प्रसंगाने हातखंबा गावावर मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये पुन्हा एकदा संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- नियंत्रण सुटलेल्या ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक
बुधवारी सायंकाळी 5.45च्या सुमारास शिवम गोताड आणि निशांत कळंबटे हे दोघे त्यांच्या दुचाकीवरून झरेवाडीकडे निघाले होते. हातखंबा येथील हायस्कूलच्या समोरील तीव्र उतारावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कोळसावाहू ट्रकच्या (क्र. केए 29सी 1843) चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने थेट गोताड यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत शिवम गोताड जागीच ठार झाला तर त्याचा मित्र निशांत कळंबटे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी ऊग्णालयात दाखल केले आहे.
- ट्रकने आणखीन काही दुचाकी, कारना ठोकरले
अपघातामुळे गोंधळलेल्या ट्रक चालकाने पुढे जाऊन आणखी 3 दुचाकी आणि 4 कारला धडक दिली. यात 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ जखमींना जवळच्या ऊग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक एका बाजूने सुरू केली आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली.

- वारंवार होणारे अपघात: एक गंभीर समस्या
गेल्या काही महिन्यांपासून हातखंबा परिसर अपघातांसाठी चर्चेत आहे. अवघ्या दीड महिन्यांपूर्वीच, ऑगस्ट महिन्यात याच धोकादायक वळणावर गॅस वाहतूक करणाऱ्या 2 टँकरचे अपघात झाले होते. एका अपघातात तर गॅसची गळती झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती आणि वाहतूक सुमारे 15 तास बंद ठेवण्यात आली होती. या अपघातांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता-रोको आंदोलनही केले होते. त्यावेळी प्रशासनाने या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजच्या अपघाताने ही आश्वासने फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
- प्रभावी उपाययोजनांच्या मागणीला जोर
स्थानिक नागरिकांच्या मते, मुंबई-गोवा आणि रत्नागिरी-कोल्हापूर या दोन्ही महामार्गावर अवजड वाहनांची वाढती वाहतूक आणि रस्त्याची खराब स्थिती यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हातखंबा येथील तीव्र उतार व वाढती अवजड वाहनांची वाहतूक यामुळे येथे वारंवार अपघात घडत असल्याच्या तक्रारी होत आहेत. प्रशासनाने यावर तत्काळ उपाययोजना न केल्यास या भागातील वाहतूक अधिक धोकादायक होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आजच्या घटनेनंतर पुन्हा एकदा अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.








