बेळगाव : शहराबरोबरच शहापूर परिसरातही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यांच्याकडून नागरिकांचा चावा घेतला जात आहे. दोन दिवसांपूर्वी संभाजी प्रकाश शिंदे (वय 39) राहणार नवी गल्ली, शहापूर या तरुणाचा कुत्र्याने चावा घेतला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून शहर व उपनगरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. मात्र, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासह निर्बिजीकरण करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. निर्बिजीकरण करण्यासाठी महापालिकेला ठेकेदार मिळणेही आता कठीण झाले आहे.
जुन्या ठेकेदाराची रक्कम देण्यास महापालिकेने चालढकल चालविल्याने जुन्या ठेकेदारानेही गेल्या काही दिवसांपासून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे बंद केले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अलीकडेच झालेल्या आरोग्य स्थायी समिती बैठकीत आरोग्य विभागाकडून शनिवार दि. 3 रोजी तिसरी निविदा काढण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र या निविदेला तरी प्रतिसाद मिळणार का? हे पहावे लागणार आहे. भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांचा चावा घेण्याचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडलेल्या संभाजी शिंदे या तरुणाचा कुत्र्याने चावा घेतला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









