मंत्री सुभाष फळेदसाई यांचे प्रतिपादन
धारबांदोडा : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असलेले फलक गाडीवर लावून किंवा टीशर्टवर रंगवून शिवप्रेम जागृत होणार नाही. त्यासाठी महाराजांचे विचार आचरणात आणावे लागतील. खास करून विद्यार्थ्यांनी शिवरायांचा इतिहास व चरित्र वाचावे, असे प्रतिपादन समाजकल्याणमंत्री सुभाष फळदसाई यांनी केले. धारबांदोडा तालुका शहाण्णव कुळी क्षत्रिय मराठा समाज समितीतर्फे आयोजित केलेल्या ज्ञाती समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सुकतळे मोले येथील बाळसती देवस्थानच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, प्रमुख वक्ते अॅड. वल्लभ गावस देसाई, धारबांदोडा तालुका अध्यक्ष राजेंद्र प्रभूदेसाई, सचिव अनिल सावंत देसाई व खजिनदार मंगलदास देसाई हे उपस्थित होते. वल्लभ देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रमुख घटना आपल्या व्याख्यानातून सांगितल्या. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा आमदार राजेश फळदेसाई यांनी यावेळी केली. विद्यार्थ्यांनी शिक्षणात मागे राहू नये. यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अनिल सावंत यांनी आमचा आजचा समाज या विषयावर भाष्य करून अहवाल सादर केला. राजेंद्र प्रभूदेसाई यांनी स्वागत केले. अश्विनी नाईक देसाई यांनी सूत्रसंचालन तर मंगलदास देसाई यांनी आभार मानले.









