प्रतिनिधी/ बेळगाव
शेतात काम करताना सर्पदंश होऊन बेळवट्टी (ता. बेळगाव) येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना घडली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. रवींद्र शिवाजी कांबळे (वय 41) राहणार बेळवट्टी असे त्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवार दि. 21 जून रोजी सकाळी कावळेवाडीजवळ शेतवडीत रताळ्याचा वेल काढताना या शेतकऱ्याच्या हाताला सर्पदंश झाला. त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला.
रवींद्रच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रवींद्र हा घरचा आधार होता. सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यामुळे सरकारने रवींद्रच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, अशी मागणी गावातील प्रमुखांनी केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागाराबाहेर गावकऱ्यांची गर्दी जमली होती.









