आंबिल गाडे पळविताना घडली दुर्घटना
बेळगाव : आंबिल गाडे पळविताना बैलगाडीच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या बसवन कुडची (ता. बेळगाव) येथील एका युवकाचा बुधवारी पहाटे खासगी इस्पितळात मृत्यू झाला आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. भरयात्रेच्यावेळी बैलगाडीखाली सापडून शेतकरी युवकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आप्पाण्णा पारीश पाटील (वय 30) असे त्या दुर्दैवी युवा शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवार दि. 24 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास आंबिल गाड्याखाली सापडून आप्पाण्णा गंभीर जखमी झाला होता. त्याला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
अंगावरून गेले चाक
बसवन कुडची येथील श्री बसवण्णा, श्री कलमेश्वर व श्री ब्रह्मदेव यात्रेनिमित्त आंबिल गाडे पळविण्याचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम बघण्यासाठी आप्पाण्णा रस्त्याशेजारी उभा होता. गाडे पळविण्याचा कार्यक्रम सुरू असताना तोल जाऊन तो बैलगाडीखाली सापडला. त्याच्या अंगावरून चाके गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा मृत्यू झाला आहे. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची पुढील तपास करीत आहेत.









