गडहिंग्लज प्रतिनिधी
गडहिंग्लज येथील युवा उद्योजक संतोष शिंदे यांनी मानसिक तणावातून पत्नी तेजस्विनी आणि मुलगा अर्जुन यांचा गळा चिरून स्वतः तणनाशक औषध प्राशन करून गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी समोर आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, संतोष शिंदे आपल्या कुटुंबासहित गांधीनगर येथे राहत होते. शुक्रवारी रात्री जेवण करून घरातील बेडरूम मध्ये गेल्यानंतर पत्नी तेजस्विनी शिंदे (वय -३६) आणि मुलगा अर्जुन शिंदे (वय- १४) यांचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर औषध प्राशन करत स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली आहे. सदर घटना कळताच घटनास्थळी डीवायएसपी राजीव नवले, पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. ही माहिती समजतात शहरातील नागरिकांनी गांधीनगर येथे त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.
घटनास्थळावरून सुसाईड नोट आणि इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुसाईड नोट मधील माहितीनुसार पुढील तपासासाठी दोन पोलिसपथके रवाना केल्याची माहिती डीवायएसपी नवले यांनी दिली. तर उद्योजक संतोष शिंदे यांच्या मृत्यूने गडहिंग्लज शहरात नागरिकांनी एकत्र येत शहरातील व्यवहार बंद ठेवले. रवाना झालेली पोलीस पथके नेमकी कोणती कारवाई करणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.









