मंत्री सुदिन ढवळीकर यांचे आवाहन
वार्ताहर / मडकई
चतुर्थी सणासाठी मुर्तीकार प्राण ओतून मूर्ती घडवत असतात. त्यांची ही कला वृद्धींगत करण्यासाठी माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे संस्थेला गणपती बनविण्याचे साचे दिले आहेत. पुढच्या वर्षी संस्थेबरोबरच कलाकारांच्या प्रत्येक घरात साचे उपलब्ध करुन दिले जातील. हे साचे व्यवस्थित सांभाळतानाच तरुण कलाकारांनी या कला क्षेत्रात यावे व ही पारंपारिक कला टिकवून ठेवावी, असे आवाहन वीजमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले.
बांदोडा ग्रामपंचायत व माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्थानिक मूर्तीकारांना गणपती बनविण्याचे साचे, शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य व झाडांची रोपे वितरीत करण्यात आली. बांदोडा पंचायतीच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, सरपंच सुखांनद कुर्पासकर, उपसरपंच चित्रा फडते, कृषी खात्याचे अधिकारी संतोष गांवकर, साहाय्यक अधिकारी प्रणिता फळदेसाई, माधवराव ढवळीकर ट्रस्टचे संचालक मिथील ढवळीकर तसेच अन्य पंचसदस्य उपस्थित होते. गणेशोत्सवापूर्वी अनेक मूर्तीकार मूर्ती घडविण्याच्या तयारीला लागतात. या कलाकारांना माधवराव ढवळीकर ट्रस्ट व सरकारच्या माध्यमातून आपले नेहमीच सहकार्य असेल, असे मंत्री ढवळीकर यांनी पुढे बोलताना सांगितले.
रु. 2 कोटी 20 लाख खर्चून बंधाऱ्यांचे बांधकाम
देवू बांध व करंजाळ येथील कमकुवत झालेल्या बंधाऱ्याची पुर्नबांधणी करण्यासाठी 2019 साली नियोजन केले होते. मात्र कोरोना काळात ही कामे अडून राहिली. त्यामुळे खारे पाणी गावणे येथील नागरिकांच्या बागायतीत शिरल्याने बागायतदारांची नुकसानी झाली. कुणीही मुद्दामहून हे कृत्य केलेले नाही. हे बागायतदारांनी लक्षात ठेवावे. शेतकऱ्यांना भडकावण्यासाठी काही विघ्नसंतोषी लोक चुकीचा प्रचार करतात. त्याकडे दुर्लक्ष करावे. शापूरमधील झोपडपट्टीबद्दलही असाच अपप्रचार सुरु आहे. या झोपडपट्ट्या 1976 पुर्वीच्या असल्याचे त्यांना ज्ञात नसणे हे त्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल, अशी टिका सुदिन ढवळीकर यांनी केली.
खाऱ्या पाण्यामुळे ज्या बागायतीची नुकसानी झाली त्यांना भरपाई म्हणून खराब झालेल्या झाडांच्या जागी नवीन कलमे लावण्यासाठी तजवीज केली जाईल. तसेच या झाडांच्या संगोपनार्थ माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे सतत तीन वर्षे शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य केले जाईल. एकुण अंदाजे रु. 2 कोटी 20 लाख खर्चून या दोन्ही बंधाऱ्याचे कामही हाती घेण्यात येईल. त्यासाठी जलस्रोत खात्यातर्फे निविदा मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली.
गणपत नाईक म्हणाले, कृषी खात्यातर्फे कलमे वाटप, माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य व मुर्तीकारांना गणपतीचे साचे वितरीत करणे. यावरुन मंत्री सुदिन ढवळीकर यांना जनतेच्या सुखदु:खाची जाण असल्याचे सिद्ध होत आहे. गेली 25 वर्षे जनतेची गरज ओळखून ते कार्यरत आहे.
संतोष गावंकर यांनी सांगितले की, कृषी खात्यातर्फे दरवर्षी प्र्रत्येक मतदारसंघात 1 हजार कलमांचे वाटप होत असते. घरे व इमारती बांधण्याच्या नादात वृक्षांची कत्तल केली जाते. पण त्या बदल्यात झाडांचे रोपण होत नाही. म्हणूनच यावर्षी पाऊस दडी मारुन बसलेला आहे.
सुखांनद कुर्पासकर व मिथील ढवळीकर यांनी सांगितले की, मंत्री ढवळीकर यांची कार्यपद्धतीच इतरांपेक्षा वेगळी आहे. आपत्ती झाल्यास तात्काळ ते कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पाठवून त्वरीत साहाय्य करीत असतात. कुठलाच गाजावाजा त्यांचा नसतो. त्यामुळे ते करीत असलेले साहाय्य विघ्नसंतोषी माणसांना दिसत नाही. मंत्री ढवळीकरांवर उगीच कुणी टीका करु नये. नकारात्मक टीका असल्यास पंचायत मंडळ गप्प बसणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. सूत्रसंचालन चित्रा फडते यांनी केले.









