नगरविकासमंत्री भैरती सुरेश यांची महत्त्वपूर्ण घोषणा
बेळगाव : उपनोंदणी कार्यालयात नोंद नसलेल्या मिळकतींना देखील बी खाता उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा नगरविकास खात्याचे मंत्री भैरती सुरेश यांनी बेळगावातील बहुउद्देशीय व्यापार संकुल उद्घाटन कार्यक्रमात केली. मिळकतधारकांनी पाणी किंवा विजेचे बिल दिल्यास संबंधितांना बी खात्याचे वितरण केले जाणार असल्याचे सांगितल्याने शंभर रुपयांच्या बाँडवर जागा खरेदी करून घर बांधलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी टिळकवाडी येथील कलामंदिराच्या आवारात बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय व्यापार संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि नगरविकास खात्याचे मंत्री भैरती सुरेश उपस्थित होते. यावेळी मंत्री भैरती सुरेश म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेतून बहुउद्देशीय व्यापार संकुल उभारण्यात आले आहे. उत्तर कर्नाटकातील हे पहिले सुसज्ज व्यापार संकुल आहे. राज्यात विविध ठिकाणी व्यापार संकुल, बसस्थानक उभारण्यासाठी मुख्यमंत्री पुढे सरसावले आहेत. नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
50 हजार मिळकतधारकांना ई-खाता
राज्यातील 25 हजार सफाई कामगारांना सेवेत कायम करून घेण्यात आले आहे. बेळगाव महापालिकेतील 94 सफाई कामगारांना याचा लाभ मिळाला आहे. 120 विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले आहे. राज्यातील तब्बल 55 लाख मिळकतधारकांचे खाते नव्हते. त्यामुळे मिळकतधारकांना ए आणि बी खात्यांचे वितरण केले जात आहे. बेळगाव शहरात 50 हजार मिळकतधारकांना ई-खाता उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येकी 200 कोटीप्रमाणे दहा महानगरपालिकांना अनुदान देण्यात आले आहे. त्याचबरोबर आमदार राजू सेठ यांच्या मागणीनुसार उपनोंदणी कार्यालयात नोंद नसलेल्या मिळकतधारकांना देखील बी खाता दिला जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मिळकतधारकांनी पाणी किंवा विद्युत बिल दिल्यास ते ग्राह्या धरून संबंधित मिळकतींची ई-आस्थी अंतर्गत नोंद करून घेऊन बी खात्यांचे वितरण केले जाणार असल्याचे नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात असून शंभर रुपयांच्या बाँडवर जमीन खरेदी करून त्यावर घर बांधलेल्या मिळकतधारकांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.









