जगातील सर्वात मूल्यवान टीपॉट
रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर एक कप चहा 10 रुपयांमध्ये मिळू शकतो. तर कुल्हडमधील चहाचा दर 20 रुपये असतो. परंतु काही लोक महागड्या चहाचा शौक बाळगून असतात. तुम्ही कधी जगातील सर्वात मूल्यवान टीपॉटबद्दल ऐकले आहे का? जगातील सर्वात महाग टीपॉटची किंमत जाणून तुम्हाला धक्काच बसेल.
गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडलकडून अलिकडेच एका लक्झीरियस टीपॉटची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत. यानंतर हा टीपॉट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

हा जगातील सर्वात मूल्यवान टीपॉट आहे. ब्रिटनमध्ये एन. सेठिया फौंडेशनची मालकी असलेला हा टीपॉट 18 कॅरेटच्या सोन्याने तयार करण्यात आला असून याच्या बाहेरील बाजूस हीरे जडविण्यात आले आहेत. तर मध्यभागी 6.67 कॅरेटचा रुबी जडविण्यात आला आहे. तर या टीपॉटचे हँडल मेमोथच्या आयव्हरीपासून (जीवाश्म) तयार करण्यात आले आहे.
2016 मध्ये या टीपॉटची किंमत 30 लाख डॉलर्स इतकी असल्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला होता. या टीपॉट विषयीचा गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचा ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ट्विटला आतापर्यंत 73 हजाराहून अधिक ह्यूज आणि हजारो लाइक्स प्राप्त झाल्या आहेत. या टीपॉटमधील चहाचा एक कप लाखो रुपयांचा असेल अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.









