फलटण :
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी पाच दिवसांपुर्वी धाड टाकली होती. या धाडसत्रातील तपास प्रक्रियेचा अखेर रविवारी रात्री झाला. आयकर विभागाच्या चौकशीला विनाकारवाईने पूर्णविराम मिळाला. चौकशीत काहीच निष्पन्न झाले नसल्याने बंगल्यासमोर उपस्थित असणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी राजघराण्याविषयी आपल्या सकारात्मक भावना व्यक्त करीत घोषणाबाजीसह जल्लोष व्यक्त केला. दरम्यान, चौकशीनंतर सोमवार दि. 10 रोजी सकाळी रामराजेंनी ठेवलेला स्टेटस चर्चेचा आला. त्यांनी स्टेटसमध्ये ‘सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार’ असे म्हणले आहे. या स्टेटसमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
गेल्या पाच दिवसांपासुन आयकर विभागाचे अधिकारी संजीवराजे यांच्या बंगल्यात तळ ठोकुन विविध प्रकारचे पेपर वर्क करीत होते. या दरम्यान अधिक्रायांनी विविध संस्थाचे रेकॉर्डही तपासले. बंगल्यात अधिकाऱ्यांची तपासणी तर बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी असे पाच दिवसांतील नित्याचे चित्र, उलट–सुलट चर्चा, तर्कवितर्काना थांबविण्याचे या चौकशीने अधोरेखीत केले. आपल्या नेत्याला व राजकीय गटाला आधार मिळावा या हेतुने रोज बंगल्यावर येणाऱ्या कार्यकर्त्यांनी आयकर विभागाच्या विनाकारवाई तपास प्रक्रियेचे स्वागत करीत संजीवराजेंचे नेतृत्व पारदर्शी असल्याने मनस्वी समाधान वाटले असल्याच्या भावना व्यक्त केल्या. आयकरच्या चौकशी संदर्भात प्रसारमाध्यमांसमोर राजघराण्यातील सदस्यांनी व्यक्त केलेली मते अखेर सत्यात उतरल्याने राजघराण्यातील कुटुंबामध्येही आनंदी वातावरण असल्याचे स्पष्ट चित्र होते.
विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळ्कर, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत शिवांजलीराजे, श्रीमंत सत्यजीतराजे आदींनी आयकर विभागाची चौकशी हा प्रक्रियेचा भाग असतो, तो त्यांनी केला. यातून वेडवाकडे घडणार नाही, निष्पन्न तर काहीच होणार नाही, त्यामुळे चौकशी व्यवस्थित चाललीय काळजी नसावी, गर्दी करू नये, खात्याला काम करू द्यावे, अशा विविध सूचना तपासादरम्यान केल्या होत्या. चौकशीचे वास्तव अखेर बाहेर पडेल असा विश्वासही कार्यकर्त्यांना नेत्यांनी दिला होता.
चौकशीनंतर कार्यकर्त्यांशी व पत्रकारांशी संवाद करताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले, आयकर विभागातील अधिकाऱ्यांना चौकशीकामी आम्ही सहकार्य केले. त्यांनीही आम्हाला सहकार्य केले. कोणतीही कारवाई न होता या चौकशीतून आम्ही सुखरूप बाहेर पडलो. पाच दिवसांची चौकशी अखेर संपली असल्याचे अधिकाऱ्यांनी जाहिर केले. मात्र, या चौकशीतुन काहीही निष्पन्न झाले नाही. तपास प्रक्रियेच्या सुरूवातीलाच आमच्याकडे असलेली 2 लाख 35 हजार रूपयांची रोकड व काही दागदागिने अधिकाऱ्यांनी काढुन घेतले होते. तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जाताना अधिकाऱ्यांनी रोकड व दागिने आम्हाला परत केले. अधिक्रायांचा कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. सत्य असते ते सत्यच असते. फक्त अशा गोष्टींना सामोरे जायचे असते. कार्यकर्त्यांनी चौकशी दरम्यान दिलेले समर्थन व प्रत्यक्ष पाठींबा विसरता येणार नाही. आम्ही सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो.
- गोविंद डेअरीचे अधिकाऱ्यांकडुन कौतुक
आयकर विभागाकडून होत असलेली चौकशी थांबण्याअगोदर श्रीमंत शिवांजलीराजे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या, गोविंद डेअरीचे कामकाज चांगले असुन चांगल्या कंपन्यावर रेड पडत असते. ज्या कंपन्याचे कामकाज चांगले असते त्यापुढे दुप्पटीने वाढत असल्याचे मत अधिकारी वर्गाने व्यक्त केले असल्याचे शिवांजलीराजे यांनी सांगितले.
- रामराजेंचा स्टेटसने राजकीय खळबळ
5 फेब्रुवारी रोजी संजीवराजे यांच्या बंगल्यावर आयकर विभागाची धाड पडल्यानंतर ‘खात्याला काम करू द्यावे. काळजी नसावी’ असा स्टेटस विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठेवला होता. पाच दिवसानंतर आयकरचे धाडसत्र संपल्यावर दि. 10 फेब्रुवारी रोजी ‘सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार’ असा स्टेटस रामराजे यांनी ठेवला असून हा इशारा कुणासाठी व कशासाठी दिला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.








