अध्याय विसावा
एकोणिसाव्या अध्यायाचा समारोप करताना भगवंत म्हणाले, उद्धवा गुण आणि दोष पाहात राहाणे हाच सर्वात मोठा दोष आहे आणि गुणदोषांकडे लक्ष न देणे हाच सर्वात मोठा गुण होय. याचं कारण असं की, एक परिपूर्ण ब्रह्मच सर्वत्र भरून राहिलं आहे. ते परिपूर्ण असल्याने त्यात गुण दोष येणार कुठून? पण अज्ञान वाढलं की, सर्वत्र गुणदोष दिसू लागतात म्हणून असेही म्हणता येईल की, जो गुणदोष पाहू लागतो, त्याचे अज्ञान वाढले म्हणून समजावे आणि जो गुणदोष मुळीच पाहात नाही, तो ब्रह्मसंपन्न झाला म्हणून समजावे.
ब्रह्मामध्ये कांहीं गुणदोष नाहीत, हे सर्वथैव सत्य आहे. यास्तव जो गुणदोष पाहतो, त्याच्या ठिकाणी ब्रह्मत्व नाही हे सहज सिद्ध होते. म्हणून उद्धवा! कोणाचेही गुणदोष पाहू नयेत हीच माझ्या जीवीची खूण आहे. जगामध्ये चौऱयाऐंशी लक्ष योनी आहेत त्यांपैकी एका मनुष्ययोनीतील गुणदोष जरी पाहिले नाहीस, तरी तेवढय़ानेही तू नित्यमुक्त होशील. गुणदोषाची गोष्ट सोडून दिली, तरच साधकांना निजात्मपदाची प्राप्ती होते. गुणदोष हे देहाच्या ठिकाणी असतात. आत्म्याच्या ठिकाणी गुणदोष कधीच नसतात. याकरिता साधकांनी गुणदोष पाहूच नयेत. सिद्धाला तर ते दिसतच नसतात. इतक्मया उप्पर गुणदोष जर दिसू लागले तर साधकाच्या लाभावर पाणी पडते आणि सिद्धाची मिळालेली सिद्धी तत्काळ नाहीशी होते. हे देवाचे भाषण ऐकून उद्धवाला मोठा चमत्कार वाटला. तो म्हणाला, गुणदोषांचा विचार काय लोकांनी मांडला आहे का? तुम्हीच आपण होऊन वेदमुखाने गुणदोषांचे लक्षण सांगितले आहे. ते तुमचे वेदांतील बोलणे अमान्य कसे करावे? विधिनिषेधलक्षणाचा विचार केला असता ते वेदाचेच वचन दिसून येते. असे असताना तुम्ही त्याचा निषेध का करता? उद्धवाच्या प्रश्नादाखल उत्तर म्हणून गुणदोषलक्षण सांगण्याकरिता भक्ती, ज्ञान आणि कर्म हे तिन्ही भिन्न भिन्न अधिकार भगवंत सांगतील. स्वतःच्या प्रश्न आणखीन स्पष्ट करताना उद्धव म्हणाला, हे श्रीकृष्णा! तूच स्वतः वेदरूपाने गुणदोषांचे विवेचन केले आहेस. तेच आम्ही अगदी प्रमाण मानून चालत आहोत. हा विधी आणि हा निषेध, हे तुझे वेदच दाखवून देत आहेत. तो वेदानुवाद तुला मी स्पष्ट करून सांगतो ऐक. हे कमलनयना श्रीकृष्णा! वेदाची आज्ञा म्हणजे तुझी आज्ञा असल्याचे प्रसिद्ध आहे. तुझ्याच वेदातील जे विधी आहेत, त्यामुळेच गुणदोषांमध्ये बुद्धी दृढ होते. हे कृपानिधे! तेच मी उघड उघड दाखवून देतो. श्रवण करावे. अहो, तुमची जी वेदवाणी आहे, तीच मुळी गुणदोषांची उघडलेली खाण आहे. तिनेच उत्तम, मध्यम व अधम अशी मांडणी करून वर्णाश्रमातील भेद दाखविला आहे. द्रव्यसुद्धा योग्य कोणते व अयोग्य कोणते हा भेदही वेदानेच दाखविला आहे. तसेच पवित्र स्थळ कोणते व अपवित्र कोणते? उचित काल कोणता व अनुचित काल कोणता? हेही दाखविले आहे. पूर्ववयामध्ये चित्त स्थिर असते, तारुण्यामध्ये तेच कामलोलुप होते आणि वार्धक्मयामध्ये तेच अत्यंत कुश्चित होते. याप्रमाणे तुझ्या वेदानेच गुणदोष उत्पन्न केले आहेत! देवा ! पाहा ! तुझाच वेद स्वर्ग आणि नरक असल्याचे सांगतो. आणि त्याकरिता कर्माची आवश्यकता सांगून साधकबाधक कर्मे कोणती तेही दाखवून देतो. म्हणून तुझा वेदच गुणदोषांचे माहेर होय. हे गुण आणि हे दोष असे म्हटले की, त्या उभयतात वैर लागते आणि ते गुणदोष स्पष्ट करून दाखविणारा खरा असा तुझा वेदच आहे. वेदवाणीनेच हे वैर लावून देऊन गुणदोषांचे महत्त्व वाढवले आहे. तेव्हा वेदवचनाने प्राण्याला मोक्ष तो कसा मिळणार? एकूण तुझे भाषण ऐकल्याने दोहीकडूनही अडचणच उत्पन्न होते. तेव्हा वेद हे प्रमाणभूत मानावे किंवा नाहीत हे मुळीच कळत नाही. तू तर म्हणतोस गुणदोष पाहता कामा नयेत आणि तुझे वेदवचन मानावे तर गुणदोष पाहात बसले पाहिजे. असल्या तुझ्या भाषणाने मोठे ज्ञानीसुद्धा संशयांत पडतात. मग इतर यःकश्चित् माणसं गोंधळून गेली नाहीत तरच नवल ?
क्रमशः







