चित्रपटात कामे मिळविण्यासाठी अभिनेत्रींना विविध प्रकारचे समझोते करावे लागतात, हे ओपन सिपेट मानले जाते. भारतातच नव्हे तर पाकिस्तानही अशी परिस्थिती आहे, हे पाकिस्तानी अभिनेत्री जर्निश खान हिने केलेल्या नव्या वक्तव्यामुळे उघड झाले आहे. तिचे वक्तव्य वादग्रस्त ठरले असून ती सोशल मीडियावर बऱयाच प्रमाणात ट्रोल झाली आहे. मात्र, तिच्या समर्थकांची संख्याही लक्षणीय आहे. तिने नुकतीच एक पोस्ट व्हायरल केली असून त्यात चित्रपटसृष्टीत महिलांना अनेक प्रकारचे समझोते मनाविरुद्ध करावे लागतात, असा पर्दाफाश केला आहे.
मोठय़ा प्रमाणावर ट्रोल झाल्यामुळे नंतर तिला काहीशी माघार घ्यावी लागली. आपल्या पोस्टमुळे महिलांचा अपमान झालेला नाही. तसेच चित्रपटसृष्टीतील व्यवहारांबद्दल ती पोस्ट नव्हती, अशी सारवासारवही करण्याचा प्रयत्न तिने केला. चित्रपटांमधील महिला कलाकारांवर होणाऱया कॉमेंट्स, टोमणे आणि मिम्सबद्दल आपण बोलत होतो. केवळ चित्रपट नव्हे तर प्रत्येक व्यवसायात असे समझोते करावे लागतात, असे म्हणत तिने हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
जर्निश खान ही वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहे. ती पाकिस्तानातील टीव्ही अभिनेत्री असून तेथील काही लोकप्रिय मालिकांमध्ये तिने कामे केली आहेत. मात्र, तिच्या या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील काही गोपनीय बाबी समोर आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसते. पाकिस्तानी चित्रपटसृष्टी ‘स्वच्छ’ आहे असा टेंभा मिरविला जातो. अनैतिक प्रकार येथे चालत नाहीत, अशीही काही जणांची श्रद्धा आहे. या समजुतींना तिने धक्का दिल्याचे बोलले जात आहे. शेवटी घरोघरी मातीच्याच चुली असतात.









