मास्क लावून घेतली जाते मुलाखत
सद्यकाळात बहुताश कंपन्या या नोकरी प्रदान करण्यासाठी मुलाखती घेतात. यात अर्जदाराची पात्रता पडताळून पाहिली जाते. तसेच उमेदवार नोकरीसाठी योग्य आहे की नाही हे पाहिले जाते. संबंधित उमेदवाराची आत्मविश्वासाची पातळी, वर्तन याचे निरीक्षण केले जाते. परंतु चीनच्या एका कंपनीने अनोखा मार्ग अवलंबिला आहे. या कंपनीत चेहऱयावर मास्क लावून मुलाखत द्यावी लागते. जॉबसाठी चेहरा नव्हे तर पात्रता अधिक महत्त्वाची असल्याचे या कंपनीचे मानणे आहे.

या कंपनीने काही दिवसांपूर्वी भरती प्रक्रियेच्या अंतर्गत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. याचा व्हिडिओ चीनमध्ये सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत संबंधित उमेदवार चेहऱयावर मास्क लावून मुलाखतीची प्रतीक्षा करत असल्याचे दिसून येते. तसेच त्यांचा चेहरा पूर्णपणे मास्कने झाकला गेला होता. मुलाखत घेणारा व्यक्तीही पूर्ण पणे मास्क परिधान करून होता. या मुलाखतीवेळी कुणी कॅट मास्क, तर कुणी डॉग मास्क तसेच एलियन मास्क परिधान करून आला होता. याचा सर्वाधिक लाभ स्वतःच्या लुक्सवरून घाबरणाऱया लोकांना झाल्याचे म्हटले गेले आहे.

सर्वोत्तम उमेदवाराची निवड
चेंगदू एंट लॉजिस्टिक्स या कंपनीने हा अभिनव मार्ग स्वीकारला आहे. या कंपनीत मीडिया ऑपरेटर, लाइव्हस्ट्रीम ब्रॉडकास्टर आणि डाटा ऍनलास्टिक समवेत अनेक पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. आम्ही लोकांच्या योग्यतेवर अधिक लक्ष केंद्रीत करतो. कोण चांगला दिसतो यापेक्षा तो किती चांगले काम करू शकतो हे महत्त्वाचे आहे. उत्तम उमेदवाराची निवड करणे हाच आमचा उद्देश आहे. या प्रयोगामुळे उमेदवारांमध्ये तणाव निर्माण होत नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.
अनोख्या मुलाखतीमुळे ओळख
सोशल मीडियावर लोक या कंपनीचे कौतुक करत आहे. अशा उपक्रमांमुळे सोशल फोबियातून लोक बाहेर पडतील असे काही लोकांनी म्हटले आहे. ही कंपनी अनेक प्रकारच्या प्रयोगांसाठी ओळखले जाते. यापूर्वी एका मुलाखतीत उमेदवाराकडून पार्कमध्ये खणून घेण्यात आले होते, यावेळी त्याच्या धैर्याची परीक्षा घेण्यात आली होती.









