कोल्हापूर / इम्रान गवंडी :
शहरातील प्रमुख बाजारपेठ असणाऱ्या छत्रपती शिवाजी मार्केटमधील समस्या गंभीर रूप धारण करत आहे. स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झाली असुन काही स्वच्छतागृहे बंद आहेत. मार्केटमध्ये दिवसाढवळ्या मद्यपींचा वावर वाढला आहे. गळके छत, स्वच्छतेचा अभाव, दुर्गंधी, लाईट बंद, महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. गाळ्यांचे भाडे घेता, टॅक्स घेता, भाडे तटले की गाळे सिल करता.. मग सुविधा का देत नाही…? असा प्रश्न येथील विक्रेते उपस्थित करत आहेत.
छत्रपती शिवाजी मार्केटमधील दुकान गाळ्यांच्या छतातून पाणी झिरपत आहे. गेल्या 16 वर्षापासून गाळेधारकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. येथील काही स्वच्छतागृहे बंद असल्यामुळे महिलांची कुचंबना होत आहे. येथील वायरिंग जुने झाले आहे. यातील काही वायरी लोंबकळत आहेत. त्यातच मार्केटमधील छताच्या स्लॅबमधून पाणी झिरपत आहे. झिरपलेले पाणी वायरिंगमध्ये शिरत असुन धोका वाढला आहे.

मार्केटच्या सुरक्षेसाठी नव्याने बसवलेले 9 गेट मोडलेले आहेत. त्युमळे मार्केट पूर्णपणे ओपन झाले आहे. सहज प्रवेश करता येत असल्यामुळे मद्यपींचा वावर वाढला आहे. मार्केटमध्ये प्रवेश करताच ग्राहकांना दुर्गंधीचा सहन करावी लागत आहे. मार्केटची झालेली दूरवस्था त्यातच रस्त्यावर वाढलेल्या व्यवसायामुळे ग्राहकांची संख्या रोडावली आहे. भाजी विक्रेतेही कमी झाले आहेत. दिवसभर थांबूनही व्यवसायच होत नसल्यामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली असल्याचे गाळेधारकांनी सांगितले.
- अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी
छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये विवाह नोंदणी कार्यालय, मतदार नोंदणी कार्यालय, एलबीटी ऑफीस, इस्टेट ऑफीस, घरफाळा, पाणीपुरवठा, ड्रनेज विभाग, प्राथमिक शिक्षण समिती, परवाना विभाग आदी कार्यालये आहेत. यातील अधिकारी, कर्मचारी येथूनच ये-जा करत असतात. त्यांना सदर दूरवस्था दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- भटक्या कुत्र्यांचा वावर दिवसभर
भटक्या कुत्र्यांचा वावरही वाढला आहे. दिवसभर कुत्र्यांचा उपद्रव सुरू असतो. काहीवेळा ही कुत्री थेट अंगावर धावून येतात. याबाबत तक्रार करूनही कोणतीच दखल घेतली जात नाही.

- लाईट मीटरमध्ये पावसाचे पाणी
पाच ठिकाणी लाईटचे मिटर बसविले आहेत. सर्वच मिटर उघडी पडली असुन यामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. सर्व मिटर बंदिस्त करण्याची गरज आहे. हे मीटर कधीही शॉर्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
- स्लॅब कमकुवत
पावसाचे पाणी झिरपून स्लॅब व पिलेर कमकुवत झाला आहे. याचे ढपले पडत असुन इमारत धोकादायक बनत आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर महापालिकेला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- अंधार होताच मद्यपींचा कब्जा
मार्केटच्या तळमजल्यावर किराणा मालाचे दुकाने व इतर व्यावसायिकांचे दुकाने आहेत. तळमजल्यावर गजबज असते. पहिल्या मजल्यावर दूरवस्थेमुळे गर्दी कमी असल्यामुळे दिवसासह रात्र होताच मद्यपी मार्केटवर कब्जा करत आहेत.
- निधी जातो कुठे?
छत्रपती शिवाजी मार्केटच्या डागडूजीकरणासाठी दरवर्षी बजेटमध्ये आर्थिक तरतुद केली जाते. मात्र, इमारतीची झालेली दूरवस्था पाहून निधी कुठे खर्च केला जातो? हे न सुटलेले कोड आहे.
- उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर
महापालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे दूरवस्थेत भर पडत आहेत. दिवसभर दुर्गंधीचा सामना करतच व्यवसाय करावा लागत आहे. भाजी विक्रेत्यांची गैरसोय होत असल्यामुळे विक्रेत्यांची संख्या कमी झाली आहे. मार्केटमधील समस्यांमुळे ग्राहकांचा ओघही कमी झाला आहे. व्यवसायावर परिणाम होत असल्यामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
-इरफान बागवान, विक्रेता








