बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत डॉ. मिलिंद सरदार यांचा कानमंत्र
बेळगाव : निरोगी आयुष्य जगायचे असल्यास आहार, विहार आणि विचार यांच्यावर नियंत्रण असणे जरुरीचे आहे. सर्वांनी निसर्ग नियमाप्रमाणे वागले पाहिजे. वजन वाढले की आजार बळावतात, त्यामुळे खाण्यावर आणि जीभेवर नियंत्रण असले पाहिजे. किती वर्षे जगलो, हे महत्त्वाचे नसून, कसे जगलो हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सात्विक खाण्यासह सात्विक बोलणे महत्त्वाचे असल्याचा कानमंत्र डॉ. मिलिंद सरदार यांनी दिला. सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत बुधवार दि. 22 रोजी शेवटच्या दिवशी आनंदी आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर डॉ. मिलिंद सरदार बोलत होते. बुधवारी सायंकाळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड होते. उद्घाटक म्हणून अॅड. एम. बी. जिरली होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. अनंत लाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपाध्यक्ष प्रा. विनोद गायकवाड यांनी डॉ. मिलिंद सरदार यांचा परिचय करून दिला.
आनंदी आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. मिलिंद सरदार यांनी अनेक उदाहरणे दिली. शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक या स्तरावर समतोल राखल्यास निरोगी आयुष्य जगता येते. ही सर्व कारणे आजारास कारणीभूत आहेत. व्यायामाचा अभावही आजाराला कारणीभूत असून निसर्ग नियमाप्रमाणे जगण्यासह आयुष्य आजपासून एक सेलिब्रेशन म्हणून जगा. आपण खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो याचा विचार होणे जरुरीचे आहे. चुकीचे खाणे, चुकीचे बोलणे टाळले पाहिजे. सर्वांनी सात्विक आहार सेवन करणे फायदेशीर आहे. तामसिक आहार आणि प्राण्यांचा आहार असून सर्वांनी माणसासारखे खाल्ले पाहिजे. तुम्हीच तुमच्या आनंदी आणि सुदृढ जीवनाचे शिल्पकार आहात. सकाळी राजासारखे, दुपारी सेवकासारखे आणि रात्री भिकाऱ्यासारखे जेवण केले पाहिजे. आहार औषधाप्रमाणे घेतला तर आयुष्यभर औषधे आहारासारखी घ्यावी लागणार नाहीत. व्यायाम, आहार आणि विचार या तिन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवल्यास आनंदी जीवन जगता येते. पण अनेकांना कळतंय पण वळत नाही. त्यामुळे सर्वांनी व्यायाम करण्याचे संस्कार आपल्या मुलांना द्यावेत, असे महत्त्वाचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. डॉ. मिलिंद सरदार यांचे आनंदी आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावरील मार्गदर्शन ऐकण्यासाठी श्रोत्यांनी हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिरात गर्दी केली होती. सूत्रसंचालन कार्यवाह सुनीता मोहिते यांनी केले.









