वृत्तसंस्था/ केदारनाथ
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तराखंडमधील बद्रीनाथ तसेच केदारनाथ येथे जात दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्र, मुख्य गृह सचिव संजय प्रसाद हे देखील होते. केदारनाथ येथे पोहोचल्यावर योगी आदित्यनाथ यांचे बद्री-केदार मंदिर समितीचे अध्यक्ष अजय अजयेंद्र तसेच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वागत केले आहे. तर पुरोहित समाजाने परंपरागत मंत्रोच्चारासह योगींचे स्वागत केले आहे. योगींनी बाबा केदारनाथचे दर्शन घेत जागत सुखसमृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली आहे.
योगी आदित्यनाथ यांनी रविवारी सकाळी बद्रीनाथ धाम येथे पोहोचत भगवान बद्री विशालचे दर्शन घेतले होते. तसेच त्यांनी ब्रह्मकपालमध्ये पिंडदान केले आहे. यानंतर ते थेट माणा पास येथे पोहोचले आणि त्यांनी सीमाक्षेत्राची पाहणी केली आहे. यादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी घसतोली येथील आयटीबीपी चौकीत तैनात आयटीबीपी, सैन्य आणि बीआरओच्या जवान अन् अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे.
सीमाक्षेत्रातून परतल्यावर योगींनी बद्रीनाथ धाम येथे खासगी हेलिपॅडनजीक निर्माण करण्यात येणाऱ्या यूपी भवनाची पाहणी केली. तेथे निर्मितीकार्यात सामील कामगारांशी संवाद साधला तसेच त्यांच्यासोबत छायाचित्रे काढून घेतली आहेत.









