उर्दू-इंग्रजीवरून वाद : समाजवादी पक्ष दुटप्पी असल्याची योगींची टीका
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेश विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस अत्यंत गोंधळाचा राहिला. अधिवेशनाच्या प्रारंभीच विरोधी पक्षाच्या आमदारांनी चौधरी चरण सिंह यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने सुरू केली. राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान त्यांनी घोषणाबाजी केली. अभिभाषणानंतर कामकाज काही वेळ स्थगित करावे लागले. यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच उर्द आणि इंग्रजीवर सत्तारुढ अन् विरोधकांमध्ये वाक्युद्ध झाले. समाजवादी पक्ष हा दुटप्पी आहे. सप नेते स्वत:च्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवितात, परंतु इतरांच्या मुलांनी गावातील शाळांमध्ये शिकावे असे सांगतात. सपचे हेच नेते उर्दूचा पुरस्कार करत असल्याची टीका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
विधानसभा अध्यक्षांनी कामकाजात हिंदीसोबत अवधी, भोजपुरी, बृजभाषा, बुंदेलखंडी आणि इंग्रजीच्या वापराची माहिती दिल्यावर विरोधी पक्षनेते माता प्रसाद पांडे यांनी इंग्रजीचा विधानसभेतील वापर चुकीची असल्याचे म्हटले आहे. आम्ही बुंदेलखंडी, भोजपुरी इत्यादी भाषांना विरोध करत नाही, परंतु इंग्रजीच्या वापराला विरोध आहे. हिंदीला विधानसभेची भाषा घोषित करण्यात आले आहे. इंग्रजी आणून हिंदीला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातोय. इंग्रजी हटविण्यासाठी आम्ही यातना झेलल्या आहेत. दिल्ली, लखनौ, गोरखपूरच्या तुरुंगात कैद राहिलो आहोत. इंग्रजीचा समावेश होत असेल तर उर्दूलाही स्थान द्यावे, असे पांडे यांनी म्हटले.
उत्तरप्रदेशच्या विविध बोलीभाषांना या सभागृहात सन्मान मिळत आहे. सरकार या सर्व भाषांच्या विविध अकॅडमीच्या स्थापनेच्या कार्याला पुढे नेत आहे. सभागृहात विविध समाजाचे सदस्य आहेत. तर इंग्रजी भाषेला विरोध करणारे सप नेते स्वत:च्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवितात, तर इतर मुलांना सरकार ही सुविधा देऊ इच्छित असेल तर समाजवादी नेते उर्दू शिकवा असे सांगू लागतात. समाजवादी नेते सर्वसामान्य मुलांना मौलवी करू इच्छित आहेत का असे प्रश्नार्थक विधान योगींनी केले आहे.









