अध्याय पहिला
बाप्पा म्हणाले, जीवनमुक्ती आणि विदेह्मुक्ती असे योग्याच्या जीवनातील दोन टप्पे आहेत. अखंड समाधीसुख भोगत असलेला योगी जीवनमुक्त असतो. आपल्याला समाधीतून सुख मिळत आहे ह्याची त्याला जाणीव असते. असे सुख त्याला त्याच्या योगसाधनेमुळे प्राप्त होते आणि ते भोगून झाले की त्यांची जीवनमुक्त ही अवस्था संपुष्टात येऊन त्याच्या देहाचे पतन होऊन त्याचा आत्मा देहातून मुक्त होतो. ह्याला विदेह्मुक्ती असे म्हणतात. जीवनमुक्त योगी भूतमात्रावर अनुग्रह करण्यासाठी भ्रमण करत असतात. अमुक एक हवं असा त्यांचा कोणताही आग्रह नसतो. जे वस्त्र मिळेल ते पांघरून, मिळेल ते खात आणि कशाच्या तरी आश्रयाला ते रहात असतात. करुणेने त्यांचे हृदय भरलेले असते. त्यांनी क्रोधावर ताबा मिळवलेला असतो आणि ज्ञानेंद्रिये त्यांच्या कह्यात असतात. कोणत्याही स्थानी अचानक पोहोचून तेथील पात्र अधिकारी साधक ते बरोबर हुडकून काढतात. तेथे जाऊन ते त्यांना उपदेश करतात. या मंडळींचे मनोबल व विवेक शक्ती मोठी प्रभावी असते. त्यामुळे जीवनात येणारे सुखदु:खाचे आवेग ते सहजी सहन करतात. ते केवळ देह तेवढा धारण करतात. मातीचे ढेकूळ, दगड आणि सोने यांची त्यांना सारखीच किंमत आहे. तुकाराम महाराज अशा पुरुषांच्यापैकीच होते म्हणून त्यांच्या अभंगातून ते योगी व्यक्तीच्या मन:स्थितीचं अनुभूतीतून वर्णन करतात ते असं,
मृत्युलोकी आम्हां आवडती परि। नाहीं एका हरिनामाविण ।।1।। विटले हे चित्त प्रपंचापासूनि। वमन ते मनी बैसलेसे ।।2।। सोने रूपे आम्हां मृत्तिकेसमान। माणिके पाषाण खडे तैसे ।।3।। तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आम्हांपुढे।।4।। साधकाचा योगीराज कसा तयार होतो, त्याची समाजाशी वर्तणूक कशी असते इत्यादि गोष्टी आपण बघितल्या. हे सर्व वाचलं की, अशा एखाद्या थोर पुरुषाची व आपली गाठ पडावी अशी इच्छा होणं स्वाभाविक आहे. वरेण्य राजालाही अशी इच्छा झाली आहे हे बाप्पांच्या लक्षात आलं, म्हणून ते पुढील श्लोकात म्हणतायत,
तमिदानीमहं वक्ष्ये शृणु योगमनुत्तमम् ।
श्रुत्वा यं मुच्यते जन्तु: पापेभ्यो भवसागरात् ।। 20।।
अर्थ-हे माझ्या प्रिय राजा, अशा तऱ्हचे महाभाग, ज्या योगामुळे दृष्टीस पडतात असा अत्यंत उत्तम योग मी तुला सांगतो ऐक. त्या योगाचं महात्म्य असं की, ज्याच्या नुसत्या श्रवणाने पापांपासून व भवसागरापासून प्राणी मुक्त होतो.
विवरण-बाप्पांच्या दृष्टीने एखाद्याने सत्पुरुषांची गाठ पडावी अशी इच्छा व्यक्त करणे, त्यासाठीची पात्रता जाणून घेणे ही किती महत्त्वाची गोष्ट आहे हे इथं लक्षात येते. सगळ्यांनाच असं वाटतं असं नाही त्यासाठी पूर्वजन्मीचे सुकृत असावे लागते. सत्पुरुषांची गाठ पडावी असं वाटायला लागलं की, ते इथून पुढं त्या व्यक्तीचं कायमचं भलं होण्याच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल असतं पण मनात आलं आणि भेट झाली असं कधी घडत नाही कारण कुणाही थोर माणसाची सहजासहजी भेट होत नाही. अशी भेट घडण्यासाठी ज्याला भेट घ्यायची इच्छा झाली आहे त्याच्या अंगी काही पात्रता असणं आवश्यक आहे.
एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरवात करावी असं वाटण्यालासुद्धा फार महत्त्व असतं. केवळ सत्पुरुषाला भेटायची उत्सुकता दाखवल्यामुळे बाप्पाना राजा अतिशय आवडू लागला. असे योगीराज हे ईश्वरी रूप असतात. त्यांची भेट होणं म्हणजे ईश्वराला भेटल्यासारखंच आहे. म्हणून अशा एखाद्या सत्पुरुषाची भेट व्हावी असं मनात येणं ही सुद्धा फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. राजाच्या मनात तशी इच्छा झाली म्हणून ते राजाला प्रिय राजा अशी हाक मारून म्हणतात, सत्पुरुषाची भेट होण्याचा योग जुळून येण्यासाठी काही पात्रता अंगी असणं आवश्यक आहे.
क्रमश:








