जौहर ट्रस्टला जमीन परत करावी लागणार
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने मंगळवारी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात ऊस उत्पादकांसाठी हमीभाव वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सप नेते आझम खान यांना झटका देणारा निर्णयही राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. आझम खान यांच्याशी संबंधित जौहर ट्रस्टला देण्यात आलेला भूखंड परत घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत झाला आहे.
योगी आदित्यनाथ सरकारने राज्याचे माजी मंत्री आणि सपचे राष्ट्रीय महासचिव आझम खान यांना मोठा झटका दिला आहे. जौहर ट्रस्टला राज्य सरकारकडून यापूर्वी देण्यात आलेल्या जमिनीप्रकरणी रामपूरचे आमदार आकाश सक्सेना यांनी सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. या भेटीप्रसंगी त्यांनी जौहर ट्रस्टला चुकीच्या पद्धतीने शासकीय भूखंड देण्यात आल्याचा मुद्दा मांडला होता. आझम खान यांच्या ट्रस्टला सुमारे 100 कोटी रुपयांचे मूल्य असणारी जमीन देण्यात आली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियमांचे उल्लंघन करत भूखंड भाडेतत्वावर देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. या प्रस्तावावर विचार करत योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाने जमीन परत घेण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे.
आझम खान हे स्वत:ची पत्नी आणि मुलासमवेत सध्या तुरुंगात आहेत. मुलाच्या बनावट जन्म प्रमाणपत्राप्रकरणी या तिघांनाही प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा झाली आहे. आझम खान यांच्या जौहर ट्रस्टवर यापूर्वीही अवैध बांधकामाप्रकरणी कारवाई झाली आहे. आझम खान हे समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते मानले जात असले तरीही ते सध्या पक्षात एकाकी पडल्याचे चित्र आहे.









