सरकार विरुद्ध संघटन वादादरम्यान उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशात सरकार विरुद्ध संघटनदरम्यान तणाव असल्याच्या चर्चेनंतर आता उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. मौर्य यांनी एका सभेत जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री असल्याचे मौर्य यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता जगात अन्य कुणी आहे का? योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या मुख्यमंत्री पूर्ण देशात आहे का अशी विचारणा त्यांनी उपस्थित समुदायाला केली आहे.
सरकारकडून चांगले काम
डबल इंजिनचे सरकार देशात सर्वात चांगले काम करत आहे. आमच्या डबल इंजिनच्या सरकारचा कार्यकाळ स्वातंत्र्यानंतरपासून आतापर्यंतचा सर्वात चांगला राहिला असल्याचे लोक जाणतात असे मौयं यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये नाराजी असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर केशवप्रसाद यांचे हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
सरकार विरुद्ध संघटन वाद
जुलै महिन्यात केशवप्रसाद यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ‘सरकारपेक्षा संघटन मोठे असते. कार्यकर्त्यांचे दु:ख माझे दु:ख आहे. संघटनेपेक्षा कुणीच मोठा नसतो. कार्यकर्ता आमचा अभिमान आहे’ असे नमूद पेले होते. मौर्य हे 2017 मध्ये उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष होते. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव देखील चर्चेत होते. परंतु पक्षाने योगी आदित्यनाथ यांची निवड करत मौर्य यांना उपमुख्यमंत्रीपद सोपविले होते. तर 2022 च्या निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांनी पक्षाला बहुमत मिळवून देत पुन्हा सरकार स्थापन केले हेते. यावेळी मौर्य यांच्यासोबत ब्रजेश पाठक यांनाही उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.









