वृत्तसंस्था/ बलरामपूर
उत्तरप्रदेशात अवैध धर्मांतर प्रकरणी जलालुद्दीन उर्फ झांगुर बाबावर योगी सरकारने कठोर कारवाई केली आहे. बलरामपूर येथील झांगूर बाबाच्या आलिशान घरावर बुलडोझर फिरविण्यात आला आहे. हे घर शासकीय जमिनीवर उभारण्यात आले होते आणि येथूनच हिंदू महिलांचे धर्मांतर घडवून आणले जात होते.
मुख्य आरोपी जलालुद्दीन उर्फ झांगूरच्या मधपूर येथील घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. हे घर नीतू नवीन रोहरा उर्फ नसरीनच्या नावावर होते. या घराच्या निर्मितीकरता झांगूरच्या पैशांचा वापर करण्यात आला होता. अतिक्रमण हटविण्यासाठी तीन नोटीस यापूर्वीच नसरीनला जारी करण्यात आल्या होत्या. नीतू, तिचा पती अन् मुलीचे झांगुरने यापूर्वीच धर्मांतर घडवून आणले होते. ते झांगुरसोबत या घरात राहू लागले होते. झांगूर, त्याचा पुत्र महबूब, नीतू उर्फ नसरीन आणि नवीनला एटीएसने यापूर्वीच अटक केली आहे. याप्रकरणी ईडीकडूनही तपास होणार आहे.
झांगूरला उत्तरप्रदेश एटीएसने चार दिवसांपूर्वी लखनौमधून अटक केली होती. त्याच्यासोबत सहकारी नीतू उर्फ नसरीनलाही पकडण्यात आले होते. दोघांच्या चौकशीतून अनेक खुलासे झाले होते. झांगूर बाबाने बलरामपूर येथे धर्मांतराचे रॅकेट चालविले होते. मुंबईपासून लखनौपर्यंत अनेक लोकांचे त्याने धर्मांतर घडवून आणले होते. काही दिवसांपूर्वी गोमतीनगर येथे धर्मांतराचे बळी ठरलेल्या लोकांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला होता. यानंतर झांगूरच्या गुन्ह्यांचा खुलासा झाला होता. झांगूरला विदेशातून रक्कम मिळत होती. आतापर्यंत ही रक्कमे कोट्यावधी रुपयात असल्याचा अनुमान आहे. आता झांगूरच्या टोळीच्या सदस्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न एटीएस करत आहे.









