अर्थसंकल्प : हरिद्वार, रीवा, सोनभद्रपर्यंत फास्ट ड्राइव्ह
वृत्तसंस्था/लखनौ
उत्तरप्रदेशत एक्स्प्रेसवेचे जाळे आणखी मजबूत करण्याची घोषणा करत योगी आदित्यनाथ सरकारने राज्यात चार नवे एक्स्प्रेसवे निर्माण करण्याची घोषणा केली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी गुरुवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आगरा-लखनौ एक्स्प्रेसवेला गंगा एक्स्प्रेसवेशी जोडणाऱ्या एक्स्प्रेसवेची घोषणा केली आहे. हा ग्रीनफील्ड एक्स्प्रेसवे फारुखाबादमार्गे हरदोईच्या कौसियापर्यंत जाणार आहे. या अर्थसंकल्पात याकरता 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारने याचबरोबर विंध्य, पश्चिम उत्तरप्रदेश आणि बुंदेलखंड भागात प्रत्येकी एक एक्स्प्रेसवे निर्माण करण्याची घोषणा केली आहे.
राज्य सरकारने 4 नवे एक्स्प्रेसवे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मेरठ ते प्रयागराज गंगा एक्स्प्रेसवेला वाराणसी, चंदौलीमार्गे सोनभद्रशी जोडण्यासाठी विंध्य एक्स्प्रेसवे निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याकरता अर्थसंकल्पात 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गंगा एक्प्रेसवेचे पश्चिम टोक मेरठला तीर्थनगरी हरिद्वारशी जोडण्यासाठी गंगा एक्स्प्रेसवे एक्सटेंशन एक्स्प्रेसवेची निर्मिती राज्य सरकार करणार आहे. याकरता देखील अर्थसंकल्पात 50 कोटीची तरतूद आहे. बुंदेलखंडमध्ये बुंदेलखंड-रीवा एक्स्प्रेसवेची घोषणा करण्यात आली असून याकरता देखील 50 कोटी रुपये अर्थसंकल्पात राखून ठेवण्यात आले आहेत. अर्थमंत्र्यांनी एक ग्रीनफिल्ड आणि तीन सामान्य एक्स्प्रेसवेची घोषणा केली आहे. तसेच राज्य सरकारने संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरसाठी अर्थसंकल्पात 461 कोटी रुपयांची तरतूद पेली आहे.









