ट्विटरवर सर्वात लोकप्रिय दहा नेत्यांमध्ये समाविष्ट : अडीच कोटी फॉलोअर्स
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदला गेला आहे. त्यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या आता अडीच कोटीच्या वर गेली आहे. त्यामुळे ते जगातील सर्वात लोकप्रिय अशा दहा नेत्यांमध्ये समाविष्ट झाले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात गुंड आणि माफिया यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडल्याने त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे.
या वर्षाच्या प्रारंभी त्यांच्या चाहत्यांची ट्विटरवरील संख्या दीड कोटी होती. आता गेल्या साडेपाच महिन्यांमध्ये या संख्येत आणखी 1 कोटीची वाढ झाली. अनेक कुख्यात गुंडांचा एन्काऊंटर त्यांच्या कार्यकाळात झाल्याने नागरिकांना सुरक्षित वाटत आहे. उत्तर प्रदेश गुंडमुक्त करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून तशी धोरणे कठोरपणे लागू केल्यापासून त्यांना गुंडांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाऊ लागले. ट्विटरवरील लोकप्रियतेचे महत्वाचे कारण हे आहे.
ट्विटर लोकप्रियतेची क्रमवारी
भारतीय नेत्यांमध्ये सध्या प्रथम क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असून त्यांचे 8.92 कोटी फॉलोअर्स आहेत. त्यांच्या खालोखाल भारतीय क्रिकेट खेळाडू विराट कोहली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे विदेशी नेत्यांमध्ये प्रथम आहेत. पंतप्रधान मोदींना मागे टाकणे कठीण आहे असे अनेकांचे मत आहे. जगातील सर्वात श्रीमंत असणारे इलॉन मस्क यांनीही आता ट्विटरवर पंतप्रधान मोदींना फॉलो करण्यास प्रारंभ केला असल्याचे दिसत आहे.









