राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत सुरू करण्याचे आदेश : बैलहोंगल तालुका इस्पितळाचाही समावेश
बेंगळूर : निपाणीसह राज्यातील 10 तालुक्यांमध्ये योग आणि निसर्गोपचार केंद्रे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सचिवांनी पत्रक जारी केले आहे. राष्ट्रीय आयुष अभियान योजनेंतर्गत कोणत्याही अतिरिक्त अनुदानाची मागणी न करण्याच्या अटीवर राज्यात 10 योग आणि निसर्गोपचार केंद्रे उघडण्याचा आदेश देण्यात आला आहे. दहा योग व निसर्गोपचार केंद्रे चालविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत खासगी भागीदारीतून आरोग्य खात्याचे सचिव व शांतीवन ट्रस्ट, धर्मस्थळ यांच्यात करार झाला होता. 2024 मध्ये हा करार संपल्यानंतर 28 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत आयुष खात्यांमार्फत योग आणि निसर्गोपचार केंद्रे आयुष खात्याच्या नियंत्रणाखाली घेऊन ती सुरू ठेवण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. उपलब्ध अनुदानाचा वापर करून अपूर्ण असणारी आणखी 10 योग व निसर्गोपचार केंद्रे सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. शांतीवन ट्रस्टकडे उपलब्ध असलेला कॉर्पस निधी आयुष खात्याकडे आणून या केंद्रांच्या कामांसाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रत्येक केंद्रासाठी 6 कर्मचारी
सदर योग व निसर्गोपचार केंद्रे आयुष खात्यामार्फत व्यवस्थापित केली जाणार असल्याने प्रत्येक केंद्रासाठी 6 कर्मचारी (1 वैद्यकीय अधिकारी, 2 थेरपिस्ट, 2 अटेंडर, 1 बहुद्देशीय कामगार) नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील एकूण 20 केंद्रांसाठी 120 कंत्राटी कर्मचारीपदे निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या वेतनासाठी अनुदान राष्ट्रीय आयुष योजनेंतर्गत 2025-26 सालातील कृती आराखड्यातून दिले जाणार आहे. यापूर्वी केवळ 10 केंद्रे शांतीवन ट्रस्टच्या भागीदारीतून चालविली जात होती.
कोणत्या 10 तालुक्यांत केंद्रे सुरू होणार
राज्य सरकारकडून कोणतेही अतिरिक्त अनुदान मागितले जाऊ नये, या अटीवर राष्ट्रीय आयुष अभियान योजनेंतर्गत राज्यातील निपाणी, बैलहोंगल, बदामी, मुधोळ, गजेंद्रगड, कुकनूर, राणेबेन्नूर, बसवन बागेवाडी, देवनहळ्ळी, एच. डी. कोटे या 10 तालुक्यांमध्ये योग आणि निसर्गोपचार केंद्रे सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.









