– वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या राणे यांच्याकडून पाहणी
प्रतिनिधी/ पणजी
सांगे हा तालुका निसर्गसंपन्न तालुका आहे. या तालुक्यात अनेक औषधी वनस्पती आढळून येतात. आता याच्याच जोडीला साळावली-सांगे येथे सुमारे 54 हजार 500 चौरस मीटर जागेत योग, निसर्गोपचार आणि आरोग्य केंद्र उभारण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. येत्या तीन महिन्यांत या प्रकल्पाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी माहिती सांगेचे आमदार तथा समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, गोवा वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. दिव्या राणे यांनी प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची व स्थितीची तीन महिन्यांपूर्वी पाहणी केली होती. त्यानंतर वन विकास महामंडळातर्फे या प्रस्तावित प्रकल्पाची योजना आखण्यात आली. या प्रकल्पामुळे वैद्यकीय पर्यटनाला वाव मिळणार आहे.
साळावली-सांगे येथे योग, निसर्गोपचार आणि आरोग्य केंद्र सुरू करताना वैद्यकीय पर्यटनाचा विचार केला आहे. या प्रकल्पात 15 ते 20 कॉटेजीस, मसाज थेरपी, आयुर्वेद उपचारपद्धती आदी गोष्टींचा समावेश आहे. गोवा वन विकास महामंडळ मर्यादितने प्रस्तावित प्रकल्पाची योजना आखली असून तज्ञांकडून माहिती मिळविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. याकामी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दिव्या राणे या प्रकल्पाबाबत नेहमी आढावा घेत आहेत, असेही मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.