अध्याय विसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, सांख्ययोगाने माझी प्राप्ती होते. त्यासाठी समोर दिसणारं जग हे निखालस खोटं आहे याची पक्की खात्री होणे आवश्यक आहे. यालाच मिथ्या आहे असेही म्हणतात. मिथ्या म्हणजे एखादी गोष्ट नजरेला दिसत असली तरी ती निरर्थक आहे असे मानणे. ज्याप्रमाणे लहानपणची खेळणी मोठेपणीही समोर दिसत असतात पण आपले मन त्यात रमत नसल्याने ती निरर्थक वाटतात. त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मग ती खेळणी एखाद्या कोपऱयात पडून असली तरी आपल्याला काही फरक पडत नाही त्याप्रमाणे समोर दिसणारा संसार मिथ्या आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या साधनेत मग्न रहावे. अर्थात संसाराकडे दुर्लक्ष करून म्हणजे त्यातील कर्तव्याकडे दुर्लक्ष करायचे नसून, ते कर्तव्य यथायोग्यपणे निभावल्यावर, त्यात गुंतून पडायचे नाही. त्यासाठी त्यातून कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही, त्यात संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या गुणदोषांबाबत विचार करायचा नाही. कारण संसारच जर खोटा आहे तर त्यातील व्यक्तीही खोटय़ाच असणार! आता हे सर्व खोटं आहे म्हटल्यावर फक्त कायम असणारी वस्तू म्हणजे परब्रह्म हीच काय ती नित्य व सर्वव्यापी आहे याची जाणीव ठेवली की, माणसाचे मन ईश्वरचिंतनात लय पावते व मनुष्य आपोआपच ब्रह्मस्वरूप होतो. हा माझ्या प्राप्तीचा सर्वोत्तम मार्ग होय. अर्थात हे सर्व लगेच साध्य होणं अवघड असल्याने, त्याला पर्याय म्हणून सद्गुरूंच्याप्रति नि÷ा ठेवण्याचा मार्ग सांगतो.
यात अभ्यास, आचरण आणि साधना याची कास धरावी म्हणजे समोर दिसत असलेल्या भोगवस्तूंचा हळूहळू कंटाळा येऊ लागतो व माणसाला आपोआपच वैराग्य येऊ लागते. जे घडतंय ते ईश्वरी इच्छेनुसार घडत असून आपल्या हिताचंच आहे अशी खात्री झाली की, तो सदैव आहे त्या परिस्थितीत खुशीने समाधानी राहू शकतो. यासाठी सद्गुरूंच्या उपदेशाचे मनात सदैव चिंतन, त्यानुसार आचरण व त्यांनी दिलेली साधना अशी त्रिसूत्री लक्षात ठेवावी. आता योगमार्गाबद्दल सांगतो. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन म्हणजे उत्तम योग होय. यासाठी सारे विषयभोग टाकून देऊन यमनियमांसह योगमार्गाचा आश्रय करावा. यम म्हणजे टाळावयाच्या गोष्टी, नियम म्हणजे आवर्जून आचरणात आणायच्या गोष्टी होत. प्रत्यक्ष योग साधण्यासाठी चांगल्या रीतीने आसनावर बसून ‘मूलाधार’ चक्रावर लक्ष ठेवून मुद्रा साधावी. त्यावेळी अपानवायू ऊर्ध्वमुखाने ‘स्वाधि÷ान’ चक्राला पोचेपर्यंत वाढत जातो आणि प्राणवायु प्राणायामाने अडला म्हणजे पुन्हा नाभिस्थानाकडे मुरडतो. तेव्हा प्राण आणि अपान हे दोन्ही सम झाले म्हणजे स्वतः वायु शरीरातील मलक्षालन करून पिंडब्रह्मांडाची शुद्धी करतो.
कफ आणि पित्त दोन्ही खाऊन टाकून शरीरातील नाडय़ा शुद्ध करू लागतो. जुने साचलेले मळ असतात तेही तो तत्काल नाहीसे करून टाकतो. वायूचे सामर्थ्य फार मोठे व विलक्षण आहे. तो पिंडातील व ब्रह्मांडातील सारे मळ धुऊन टाकून निर्मळ करून सोडतो. इतकी पवित्रता केवळ ह्या ‘महायोगाने’ होते पण त्यावेळी अनेक चित्रविचित्र संकटे येतात. मोठमोठय़ा विघ्नांची उडी येऊन पडते. नाना विकल्प मनात उद्भवतात आणि सिद्धींची नागवण तर रोकडी येऊन पडते.
उद्धवा! इतकी विघ्नं अंगावर येऊन आदळली तरी साधकाने जर धैर्य सोडले नाही, तरच खरोखर प्राणापान सम होतील, हे सत्य समज. असे झाले की, प्राणायाम सिद्ध झाला असे म्हणता येईल. प्राणापानांची अशी मिळणी झाली म्हणजे ‘कुंडलिनी’ शक्ति जागृत होते आणि ती त्या प्राणापानांना घेऊन सुषुम्ना नाडीमध्ये शिरते. ती अचाट असलेली आदिशक्ति पाठीच्या कण्यातून वर चढू लागते. तेथील षट्चक्रांचा कडकडाट मोडून वायु अगोदरच तिचा मार्ग सपाट करून ठेवतो. त्या मार्गाने कुंडलिनी जाऊ लागली म्हणजे आधिव्याधींच्या लाटा बंद पडतात. विकल्पाच्या वाटा मोडून जातात आणि मोठमोठय़ा विघ्नांच्या झडीही बाधत नाहीत.
क्रमशः







