आज नववा आंतरराष्ट्रीय योग दिन : चिंताग्रस्त समाज मन दूर करण्यासाठी योग उपयुक्त
बेळगाव : आज आंतरराष्ट्रीय योग दिन. योग आणि अध्यात्म ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. भारतासह जगभरात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र संघामध्ये केलेल्या भाषणामध्ये या दिनाचा प्रस्ताव दिला होता. जगभरातील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करेल. हा प्रस्ताव मान्य होवून त्या वर्षीपासून योग दिन आचरण्याचा प्रघात सुरू झाला.
योग हा शब्द युज या संस्कृत धातूपासून बनला आहे. ज्याचा अर्थ आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे होय. योग म्हणजे निव्वळ व्यायाम किंवा आसन नव्हे तर त्यामुळे भावनिक व मानसिक समतोल साधला जातो. योग 10 हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रचलित आहे. योग हे विज्ञान आहे. ती जीवनाची विकसित शैली आहे. मुख्य म्हणजे योग जात, धर्म, पंत असे कोणतेही भेद करत नाही. कोणीही साधक, संसारी, वैरागी, अभ्यासी, गृहस्थ, स्त्राr-पुऊष कोणीही असो योग सर्वांसाठी उपयुक्त आहे. आज अनेक ताण-तणावामुळे समाज मन चिंताग्रस्त बनले आहे. हा ताण दूर करण्यासाठी योग साधना अतिशय उपयुक्त आहे. राजयोग, हट्टयोग, लययोग, ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग असे योगाचे प्रकार आहेत.महर्षि पतंजली ‘योगसूत्र’मध्ये ‘योग: चित्त-वृत्ती, निरोध:. अशी योगाची व्याख्या करतात. म्हणजेच योग आपल्या चित्तवृत्ती सुधारतो. कोरोनासारख्या महामारीने आपल्याला आरोग्याबाबतीत जागरुक केले. आपले शरीर निरोगी असेल तरच आपल्याला सर्व आनंद घेता येवू शकतो. शरीर निरोगी राहण्यासाठी औषधोपचारांपेक्षा लहानपणापासूनच योगासनांचा सराव सुरू ठेवल्यास आजार दूर राहतो. हेच बिंबविण्याचे प्रयत्न योग दिनानिमित्त केले जात आहे.
योग केवळ गुहेमध्ये किंवा पर्वतांवर राहणाऱ्या साधूंपुरताच मर्यादित नाही. तो सर्वांसाठीच आहे. खुद्द कृष्णाने युद्धभूमीवर अर्जुनाला योग साधनेबद्दल उपदेश केला आहे. अलिकडच्या काळामध्ये पतंजलीचे प्रणेते योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांनी योग घराघरापर्यंत पोहोचविला. 1995 मध्ये प. पू. रामदेवबाबा व बाळप़ृष्णबाबा यांनी हरिद्वार येथे दिव्य योगपीठ सुरू केले. तेव्हापासून त्यांनी योग आणि आयुर्वेद यांचे महत्त्व जनमानसांत पोहोचविण्यासाठी अविरत धडपड केली. 2005 मध्ये देशातील विविध जिल्ह्यातील योग साधकांना निमंत्रित करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आणि 2006 मध्ये पतंजली समितीच्या शाखा देशभरात सुरू झाल्या. आज जिल्हा, तालुका आणि ग्राम पातळीवर या शाखा कार्यरत आहेत. रामदेवबाबा यांनी योग क्रांती केली तर आचार्य बाळकृष्ण यांनी आयुर्वेद क्रांती केली. यंदाच्या जागतिक योग दिनाचे घोषवाक्य ‘वसुधैव कुटुंबकम’ असे आहे. अर्थातच भारत योग दिनाचा प्रणेता असल्याने संपूर्ण भारतामध्ये आज हा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त लोक एकत्र येणार आहेत आणि ‘हे विश्वची माझे घर’ या संकल्पनेला बळकटी मिळणार आहे.
योगामुळे आरोग्य सुधारते
योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. शरीराची लवचिकता वाढते. हृदय संतुलित राहते. महत्त्वाचे म्हणजे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करून शांत निद्रेसाठी योग पूरक ठरतो. योगामुळे शारीरिक वेदना कमी होवून शरीर गतिशील होते, स्नायू बळकट होतात. रक्ताभिसरण सुधारुण, थकवा कमी होवून ऊर्जेची पातळी वाढते. योग कॅलरी बर्न करतो आणि पचन क्रिया सुधारतो.









