संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात होणार कार्यक्रम
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमाचे नेत्वृत्व करणार आहेत, अशी माहिती विदेश व्यवहार विभागाने दिली आहे. ते 20 जून ते 25 जून या कालावधीत अमेरिका आणि इजिप्तचा दौरा करणार आहेत.
21 जून ते 23 जून असे तीन दिवस त्यांचा अमेरिका दौरा होणार आहे. या दौऱ्यात महत्वपूर्ण संरक्षण सामग्री करार, तसेच इतर अनेक करार होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील राजकीय, आर्थिक आणि सामरिक जवळीक अधिक वाढणार असून दोन्ही देशांच्या धोरणात्मक भागिदारीला यामुळे अधिक महत्व प्राप्त होईल, असे तज्ञांचे मत आहे.
योगदिनाचे नेतृत्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जूनला भारतातून प्रयाण करणार आहेत. 21 जूनला ते न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयाला भेट देतील. हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा केला जातो. ते मुख्यालयात योगदिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व करतील. आंतरराष्ट्रीय योगदिनाचा प्रारंभ त्यांच्याच पुढाकाराने 2014 मध्ये झाला होता. यंदाचा योगदिन हा दहावा असेल.
व्हाईट हाऊस स्वागतासाठी सज्ज
योगदिनाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे जातील. तेथे 22 जूनला अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्या अधिकृत अध्यक्षीय निवासस्थानी त्यांचे स्वागत करण्यात येईल. त्यांची अध्यक्ष बायडेन यांच्या समवेत विस्तृत चर्चा होईल. त्याच दिवशी रात्री अध्यक्ष बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल यांनी पंतप्रधान मोदींसाठी शासकीय भोजनसमारंभ आयोजित केला आहे, अशीही माहिती परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अमेरिकन लोकप्रतिनिधींसमोर भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीसमोर भाषण करणार आहेत. असे भाषण दोनदा करणारे ते प्रथमच नेते ठरणार आहे. त्यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी संयुक्तरित्या त्यांच्यासाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. अमेरिकेने या दौऱ्याला मोठेच महत्व दिल्याचे दिसून येत आहे.
उद्योगपतींना भेटणार
या दौऱ्यात ते अमेरिकेतील मोठ्या उद्योगांचा अनेक प्रमुखांशीही चर्चा करणार आहेत. भारतात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ते करतील. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या समुदायानेही त्यांच्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती देण्यात आली. त्यांच्यासह भारताच्या उद्योगपतींचे एक शिष्टमंडळही अमेरिकेच्या उद्योगपतींशी चर्चा करणार आहे. भारतात अमेरिकेची गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. विशेषत: इलेक्ट्रॉनिक उद्योगात दोन्ही देशांमध्ये सहकार्य वृद्धिंगत केले जाणार आहे.
इजिप्तलाही भेट देणार
अमेरिकेहून मायदेशी परतताना ते वाटेत इजिप्त या देशालाही भेट देणार आहेत. या एक दिवसाच्या दौऱ्यातही त्यांचे भरगच्च कार्यक्रम आहेत. इजिप्तचे अध्यक्ष एल-सीसी हे यंदा भारतात प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना इजिप्त भेटीचे आमंत्रण दिले होते.
जवळीक अधिक वाढणार
ड पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासंबंधी अमेरिकेतही मोठी उत्सुकता
ड अमेरिकेशी महत्वाचे संरक्षण विषयक करार केले जाणे शक्य
ड अमेरिकन अध्यक्ष-उपाध्यक्षांकडून दिले जाईल शाही भोजन
ड अमेरिकेच्या मोठ्या उद्योगपतींशीही पंतप्रधान चर्चा करणार








